13.7 C
Latur
Friday, November 14, 2025
Homeमहाराष्ट्रअहिल्यानगरात अग्नितांडव; कुटुंबातील ५ जण होरपळून ठार

अहिल्यानगरात अग्नितांडव; कुटुंबातील ५ जण होरपळून ठार

अहिल्यानगर : प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा फाटा या ठिकाणी असलेल्या एका फर्निचरच्या दुकानाला भीषण आग लागली आहे. या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. सध्या या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण अहिल्यानगर हादरलं आहे.

अहिल्यानगर परिसरातील नेवासा फाटा या ठिकाणी कालिका फर्निचर नावाचे फर्निचरचे दुकान आहे. हे दुकान सुमारे ५००० चौरस फूट क्षेत्रफळावर वसलेले आहे. या दुकानात काल मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. या दुकानात लाकडी फर्निचर होते. तसेच कूलर, फ्रीज, सोफा, दिवान, खुर्ची, शोकेस आणि वॉशिंग मशीन यासारख्या काही वस्तू मोठ्या प्रमाणात होत्या. यामुळे आगीने अवघ्या काही मिनिटांतच रौद्ररूप धारण केले. यानंतर दुकानात सर्वत्र आगीच्या धुराचे लोळ आणि ज्वाळा पाहायला मिळाल्या.

अहिल्यानगरमध्ये दुकानाच्या वरच्या मजल्यावर रासने कुटुंब वास्तव्यास होते. रात्रीच्या गाढ झोपेत असताना आग लागल्याने हा धूर घरात पसरला. या धूरात श्वास कोंडल्याने कुटुंबातील पाच सदस्यांचा जागेवरच गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेत मयूर अरुण रासने (४५), त्यांची पत्नी पायल मयूर रासने (३८), अंश मयूर रासने (१०) आणि चैतन्य मयूर रासने (७) आणि एक वृद्ध महिला सिंधुबाई चंद्रकांत रासने (८५) यांचा करुण अंत झाला. या दुर्घटनेत आई-वडील, दोन लहान मुले आणि वृद्ध आजी अशा पाच जीवांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान या आगीची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यांना शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. या दुर्घटनेतून मयूर रासने यांचे वडील अरुण रासने आणि त्यांची आई बचावली आहे. कारण ते मालेगाव येथे नातेवाईकांकडे गेले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR