25.9 C
Latur
Wednesday, December 17, 2025
Homeमहाराष्ट्रअहिल्यानगर-पुणे बायपास मार्गावर ‘रास्ता रोको’

अहिल्यानगर-पुणे बायपास मार्गावर ‘रास्ता रोको’

बिबट्याविरोधात नागरिक उतरले रस्त्यावर

अहिल्यानगर : प्रतिनिधी
बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांनंतर नागरिक हैराण झाले असून अहिल्यानगरमध्ये लोकांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. अहिल्यानगर तालुक्यातील इसळक, निंबळक आणि खारेखर या तीन गावांतील नागरिकांनी पुणे बायपास मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले आहे. बिबट्याला मारण्याची परवानगी द्या. तसेच बिबट्याला ठार मारण्याचे आदेश मिळेपर्यंत आंदोलन करणार अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

महाराष्ट्रातील पश्चिम घाटच्या परिसरातील अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. पारनेर, कोपरगाव आणि आता खुद्द अहिल्यानगर शहर परिसरातही गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांनी दहशत पसरवली आहे, त्यामुळे सातत्याने जीवितहानीच्या घटना घडत आहेत. या भीतीमुळे नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत.
अलीकडेच, कोपरगाव तालुक्यातील टाकळी गावात एका ६० वर्षीय महिलेवर आणि एका ४ वर्षीय चिमुकलीवर बिबट्याने हल्ला केला होता. या घटनेने परिसर हादरलेला असतानाच, आता अहिल्यानगर शहरातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ती म्हणजे बिबट्याने घराच्या अंगणात खेळणा-या एका लहान मुलीला ओढून नेले. विशेष म्हणजे, गेल्या १० दिवसांतील जिल्ह्यातील ही तिसरी घटना आहे. त्यामुळे वन विभागाने तातडीने बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

दरम्यान, लहान मुलांवर बिबट्याचे हल्ले वाढले आहेत, तसेच त्यांना शाळेत पाठवणे किंवा घराबाहेर पडणे अवघड झाले आहे असे नागरिकांचे मत आहे. अनेक लोकांनी बिबट्यांच्या भीतीमुळे शेतात जाणे देखील बंद केले आहे. यामुळे यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी केली जात आहे.

दिसेल तिथे शूट करण्याचे आदेश
दरम्यान, वनमंत्री गणेश नाईक म्हणाले की बिबट्या दिसेल तिथे शूट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांनी देखील काळजी घ्यावी. सगळेच बिबटे हल्ले करणारे नाहीत मात्र असे वाटले की हाच तो बिबट्या आहे तर त्याला भूल द्यावी किंवा जागेवर शूट करावे असे आदेश दिले आहेत, असे ते म्हणाले. नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचा प्रस्ताव वनविभागाकडे पाठवला आहे. आणि वर्षाकडून याला परवानगी मिळाल्यानंतर लगेचच आम्ही कारवाई करणार आहोत, अशी माहिती उपवनरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR