नाशिक : नाशिकमधील टीसीएस कंपनीत मुस्लिम धर्मीय संशयितांकडून हिंदू महिला कर्मचा-यांचे लैंगिक शोषण, विनयभंग व जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले आहे. देशभरात या धक्कादायक प्रकरणाची चर्चा असताना आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.
कॉर्पोरेट सेक्टरमध्ये अमृता फडणवीस यांनीही बराच काळ काम केले आहे. त्याअनुषंगाने नाशिकच्या टीसीएस कंपनीत घडलेल्या प्रकारावर अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, खूप खराब वाटत आहे आणि खेद वाटतो की, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये असे प्रकार होत आहेत. हे अतिशय वाईट आहे.
मी अॅक्सिस बँकेत काम करत असताना माझ्यासमोर अशी प्रकरणे झाली होती. मात्र, त्याविरोधात व्हिसल ब्लोईंग होऊन कायदेशीर आणि कॉर्पोरेट कायद्यांतर्गत कारवाई झाली आहे. वरिष्ठांनी तत्काळ त्या प्रकरणात कारवाई केली होती, अशी माहिती माध्यमांशी बोलताना अमृता फडणवीस यांनी दिली.
नेमके काय झाले होते असे विचारल्यावर अमृता फडणवीस म्हणाल्या, माझ्याही वेळेस, मी जेव्हा अॅक्सिस बँकेत नोकरी करत होती तेव्हा अशा केसेस माझ्यासमोर झालेल्या आहेत. त्यावेळी वरिष्ठांकडून त्या मुलांच्या विरोधात योग्य ती कारवाई करण्यात आली होती. मला असं वाटतं की, असं झाल्यानंतर तत्काळ कारवाई करणे गरजेचे आहे. तसेच सर्वांत महत्त्वाचे म्हणजे समाजाला आणि आपल्या वरिष्ठांना सांगणे जरुरीचे आहे. त्याच्यानेच हे पुढे जाऊन बंद होणार असल्याचे मत अमृता फडणवीस यांनी मांडले.
मुलींनी देखील अलर्ट राहायला हवे
परतवाडा येथील सेक्स स्कँडलच्या मुद्यावरदेखील अमृता फडणवीस यांनी भाष्य केले. ‘लव्ह जिहाद’ प्रकरण भयानकच असून आपल्या मुलींना देखील थोडे अलर्ट राहायला सांगणे गरजेचे आहे. आपण आपल्या संस्कृतीवर प्रामाणिकपणे प्रेम केल्यास असे प्रकार होत नाहीत. ‘लव्ह जिहाद’सारख्या प्रकरणांवर योग्य कारवाई होत आहे. परंतु आता मुलींनी जास्त सावध राहण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या.

