न्यूयॉर्क: अमेरिकेतील मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अॅमेझॉनच्या प्राईम एअर नेटवर्कसाठी कार्यरत असलेल्या बोईंग मालवाहू विमानाचा भीषण अपघात झाला. विमान धावपट्टीवर उतरल्यानंतर नियंत्रणाबाहेर जाऊन धावपट्टीवरून घसरले आणि अनेक वाहनांना धडकले. त्यानंतर विमानाला भीषण आग लागली. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू, तर पाच जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
वृत्तानुसार, हा अपघात रविवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी सुमारे २ वाजता झाला. हे विमान पोर्तो रिकोमधील लुईस मुनोज मारिन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करून मियामीला पोहोचले होते. मियामी विमानतळावर उतरल्यानंतर विमान धावपट्टीवरून घसरले आणि त्याची अनेक वाहनांना धडक बसली. या वाहनांमध्ये काही लोक अडकले होते. विमानाचा पायलट आणि को-पायलटदेखील कॉकपिटमध्ये अडकल्याची माहिती समोर आली.
अपघाताची माहिती मिळताच मियामी-डेड फायर रेस्क्यूची ६० हून अधिक पथके घटनास्थळी दाखल झाली. बचावकार्य आणि आग नियंत्रणात आणण्यासाठी २०० हून अधिक आपत्कालीन कर्मचारी तैनात करण्यात आले. पथकांनी विशेष फोमचा वापर करून विमानाला लागलेली आग विझवली आणि वाहनांमध्ये तसेच विमानात अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. अपघातानंतर अनेक तास विमानातून इंधनाची गळती सुरू असल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, विमानात नेमके किती जण होते आणि जमिनीवर किती लोक या दुर्घटनेत प्रभावित झाले, याबाबत अधिका-यांनी अद्याप स्पष्ट माहिती दिलेली नाही.
लँडिंगच्या वेळी विमानाचा वेग २०८ किमी प्रतितास
विमानांच्या हालचालींवर लक्ष ठेवणा-या फ्लाइटरडार २४ या वेबसाइटच्या माहितीनुसार, विमान धावपट्टीच्या वापरण्यायोग्य भागाबाहेर गेले, त्यावेळी त्याचा वेग सुमारे ११२ नॉट्स म्हणजेच जवळपास २०८ किलोमीटर प्रतितास होता. विमान धावपट्टी क्रमांक ३० वर उतरले होते. मात्र, लँडिंगनंतर विमान वेळेत का थांबू शकले नाही, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
















