कोलकाता : आरजी कार मेडिकल महाविद्यालय आणि रुग्णालयात ट्रेनी डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि हत्ये प्रकरणावरून डॉक्टरांचा संप अद्यापही सुरूच आहे. सर्वोच्च न्यायालयाने ज्युनिअर डॉक्टरांना कामावर परतण्यासंदर्भात दिलेली मुदत सायंकाळी पाच वाजता संपली आहे. यानंतर आता येत असलेल्या माहिती नुसार, बंगाल सरकारने ईमेल पाठवून विद्यार्थ्यांसोबत चर्चेसाठी संपर्क साधला आहे. मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांच्या एका शिष्टमंडळाला भेटीसाटी बोलावले आहे. मात्र, आंदोलक विद्यार्थ्यांनी ममता सरकारचा हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.
यासंदर्भात माहिती देताना टीएमसीच्या नेत्या आणि आरोग्य आणि कुटुंब राज्यमंत्री चंद्रिमा भट्टाचार्य यांनी सांगितले की, बंगाल सरकारने आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी ईमेलद्वारे संपर्क साधला आणि १० डॉक्टरांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावण्यात आले होते. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी डॉक्टरांच्या शिष्टमंडळाला भेटण्यासाठी त्यांच्या चेंबरमध्ये थांबल्या होत्या. मात्र या मेलला डॉक्टरांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. डॉक्टरांकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने मुख्यमंत्री बंगाल सचिवालयातून निघून गेल्या. मुख्यमंत्र्यांनी आंदोलक डॉक्टरांना पुन्हा एकदा कामावर परतण्याची विनंती केली आहे.
बंगाल सरकार अथवा ममता सरकारकडून चर्चेसाठी साधण्या आलेल्या संपर्कासंदर्भात प्रतिक्रिया देताना आंदोलक डॉक्टर म्हणाले, आम्हाला आश्चर्य चकित करणारा एक मेल मिळाला आहे. आमच्या पाच मागण्या होत्या, यात डीएचएस आणि डीएमई आणि आरोग्य सचिव यांना हटवण्याची मागणी होती. मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आम्हाल आरोग्य सचिवांनीच मेल पाठवला आहे.
ते म्हणाले, आम्ही १० प्रतिनिधींसह नबन्ना येते येऊ शकतो. आरोग्य सचिवांकडून ईमेल आला आहे. याकडे आम्ही सकारात्मक संकेत म्हणून पाहू शकत नाही. आम्ही चर्चेसाठी सदैव तयार आहोत, मात्र आरोग्य सचिवांकडून मेल येणे, आमच्यासाठी अत्यंत अपमानास्पद आहे.