श्रीकाकुलम : वृत्तसंस्था
आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात एक दुर्दैवी अपघात घडला असून, काशी बुग्गा वेंकटेश्वर स्वामी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत किमान १० भाविकांचा मृत्यू झाला. या घटनेत अनेक जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे. यापैकी काही जखमींची प्रकृती चिंताजनक असून, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती अधिका-यांनी व्यक्त केली आहे. सध्या या परिसरात मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
शनिवारी कार्तिकी एकादशीनिमित्त वेंकटेश्वर स्वामी मंदिरात २५,००० भाविकांची मोठी गर्दी जमली होती. या मंदिराची क्षमता केवळ २००० भाविकांची आहे. मंदिर संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळ अचानक गर्दी वाढली, ज्यामुळे भविकांमध्ये घबराट निर्माण झाली आणि चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि मदत आणि बचाव कार्य सुरू केले.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू म्हणाले, श्रीकाकुलम जिल्ह्यातील काशीबुग्गा वेंकटेश्वर मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे खळबळ उडाली आहे. या दुर्दैवी घटनेत जीवितहानी झाल्याचे ऐकून अत्यंत दु:ख झाले आहे. मी मृतांच्या कुटुंबियांबद्दल माझ्या संवेदना व्यक्त करतो. मी अधिका-यांना जखमींना सर्वोत्तम उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रूपये आणि जखमींना ५० हजार रूपये सानुग्रह मदत जाहीर करण्यात आली आहे.

