पुणे : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढविण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. नजीकच्या काळात जिल्हा परिषद, नगरपंचायत आणि महानगरपालिका निवडणुका होत आहेत. त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे.
काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश नेतृत्वाने पक्षाच्या पदाधिका-यांना स्थानिक स्तरावर युतीबाबतचे अधिकार काही दिवसांपूर्वी दिले आहेत.
काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष देवीदास भन्साळी आणि नूतन जिल्हाध्यक्ष श्रीरंग चव्हाण यांनी जिल्ह्यातील आगामी निवडणुकीबाबत भाष्य केले आहे. जिल्ह्यातील आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याच्या दृष्टीने पक्षाने तयारी सुरू केली असून शक्य असेल तेथे स्वबळावर लढविण्यात येणार आहेत.
पक्षाच्या काही लोकप्रतिनिधींनी पक्ष सोडला आहे मात्र कार्यकर्ते पक्षाशी एकनिष्ठ आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या काळात कार्यकर्ते, युवक, महिला यांना संधी देण्याचा प्रयत्न असणार आहे तसेच पक्ष संघटना अधिक बळकट करण्यावर भर देण्यात येत आहे. निवडणुकीतील आघाडीबाबतचा निर्णय हा त्या-त्या वेळच्या परिस्थितीनुसार घेण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.

