चाकूर : प्रतिनिधी
आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा पडकविण्यासाठी तयारी करा, असे आवाहन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभय साळुंके यांनी केले आहे. चाकूर तालुक्यातील कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीचे आयोजन चाकूर येथील कॉंग्रेसच्या संपर्क कार्यालयात करण्यात आले होते. त्यावेळी संवाद बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मंचावर प्रदेश सचिव एन.आर.पाटील, शेख पप्पू, माजी सभापती अजित माने, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत मद्दे, अनिल चव्हाण, रामराव बुदरे, मोहनराव पाटील, निलेश देशमुख, सिराज जहागीरदार उपस्थित होते. सांळुके म्हणाले की, महायुतीचे डब्बल इंजिन सरकार सर्वच आघाड्यावर अपयशी ठरले आहे. केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेल किंमतीत वाढ करून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले आहे.
जीएसटीच्या माध्यमातून जनतेची लूट सुरूच आहे. राज्यातील व केंद्रातील सरकारला सर्वसामान्य माणूस वैतागून गेला आहे. लोकसभेचे विरोधी पक्ष नेते खासदार राहूल गांधी ‘‘व्होट चोर गद्दी छोड’’हा नारा देऊन जनतेमध्ये जाऊन रॅलीद्वारे जनजागृती करीत आहेत.जनसुरक्षा कायदा हा लोकशाहीवर गदा आणणारा जाचक कायदा रद्द करण्यासाठी पक्षाच्या वतीने आंदोलने केली जात असल्याचे सांगून आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.इच्छुक उमेदवारांनी आपल्या मतदारसंघात जाऊन शेतकरी व शेतमजूर, बेरोजगार, निराधार, भूमिहीन शेतमजूर यांच्या हक्कासाठी शासन दरबारी आवाज उठवावा. मी तुमच्यासाठी २४ तास उपलब्ध आहे, असे ते म्हणाले. प्रास्तावीक भाषण कॉंग्रेसचे जेष्ठ नेते विलासराव पाटील चाकूरकर यांनी केले. त्यांनी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीतील राजकीय परिस्थितीचा आढावा मांडला.
यावेळी मंचावरील नेते मंडळीनी समोयोचीत मार्गदर्शन केले. तसेच वडवळ ना.नळेगांव, रोहिणा, जानवळ, चापोली येथील स्थानिक लोकप्रतिनिधीनी आपले विचार व्यक्त करून स्वबळावर निवडणूक लढवावी, अशी एकमुखी मागणी करीत महाविकास आघाडीमुळे पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते यांच्यावर अन्याय होत आहे. आघाडीच्या राजकारणामुळे कॉग्रेस पक्षाची पिछेहाट होत आहे असे विचार व्यक्त केले. या संवाद बैठकीस चापोलीचे सरपंच डॉ.भालचंद्र चाटे, अॅड.धनजय कोरे, बाबुराव चांदसुरे, सजंय पाटील, गंगाधर केराळे, सुरेश मुंडे, व्यंकटराव माने, बाळासाहेब भोसले, बालाजी शेळके, करण भिगोले, राजकुमार पाटील, रियाज पठाण, नागनाथ पकाले, खदीर शेख, सचिन चाकूरकर, गफुर मासुलदार, गौस शेख, अमजद घोरवाडे, शिराज देशमुख, युसुफ शेख, अॅड.रणजीत पाटील शेळगावकर, भुंजग अर्जुने, लहू कोरे, दयानंद मानखेडे, जनार्धन सावंत, वसंत सांळुके, अझहर शेख, विजय धनेश्वर, घुडु पटेल, अकबर पटेल, रफीक सौदागर आदीसह तालुक्यातील पाच गटांतील व दहा गणातील कॉग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. या संवाद बैठकीचे सूत्रसंचलन सोशल मिडिया प्रमुख सलीम तांबोळी यांनी केले.
















