लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘पोलीस-विद्यार्थी संवाद’ उपक्रमाला जिल्हाभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी जागरूकता, सामाजिक उत्तरदायित्व आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी हा उपक्रम प्रभावी ठरत असून ‘आजचा विद्यार्थी, उद्याचा जबाबदार नागरिक’ संकल्पनेला बळ आहे. त्याचाच एक भाग म्हणून दि. ७ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील १३ शाळा व महाविद्यालयांना भेट देऊन तब्बल ५ हजार ५२ विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यात आला.
जिल्हयात १ ऑगस्ट पासून सुरू झालेल्या या उपक्रमामध्ये पोलीस अधिकारी विद्यार्थ्यांशी औपचारिक व्याख्यान न घेता संवादात्मक पद्धतीने चर्चा करत आहेत. विद्यार्थ्यांच्या मनातील शंका, भीती आणि प्रश्न समजून घेत त्यांना कायद्याची माहिती, सामाजिक जबाबदारी आणि सुरक्षित जीवनशैलीबाबत मार्गदर्शन केले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पोलिसांविषयी विश्वास वाढत असून, कायद्याबद्दल सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होत आहे. आजच्या संवाद सत्रात ‘नशामुक्त भारत’ अभियान, नवीन फौजदारी कायदे, सायबर गुन्हे व त्यापासून बचाव, एनडीपीएस कायदा, पॉक्सो कायदा, वाहतूक नियम, हेल्मेट व सीटबेल्ट वापरण्याचे महत्त्व, सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर तसेच महिला व बालकांच्या सुरक्षेशी संबंधित विविध विषयांवर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारून संवादात सहभाग नोंदविला.
या उपक्रमांतर्गत गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीतील महात्मा फुले प्राथमिक शाळेत पोउपनि रायपल्ले, गणेश माध्यमिक विद्यालय आणि व्यंकटेश विद्यालय येथे सपोनि करे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील राजा नारायण इंग्लिश स्कूल येथे सपोनि तिडके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विवेकानंद चौक पोलीस ठाणे हद्दीतील कृपासदन इंग्लिश स्कूल येथे पोउपनि पुरी यांनी, तर शिवाजी विद्यालयात अवैध मानवी वाहतूक प्रतिबंध शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून महत्त्वपूर्ण माहिती दिली. लातूर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील जय किसान विद्यालय, गंगापूर येथे पोउपनि व-हाडे, भादा पोलीस ठाणे हद्दीतील कोहिनूर इंग्लिश स्कूल येथे सपोनि शहाने, उदगीर शहर पोलीस ठाणे हद्दीतील हावगीस्वामी महाविद्यालय येथे पोउपनि रेडेकर, अहमदपूर पोलीस ठाणे हद्दीतील जय हिंद स्कूल येथे सपोनि केदासे, तसेच वाढवणा पोलीस ठाणे हद्दीत पोउपनि हालसे यांनी, पोलीस स्टेशन देवणी हद्दीमध्ये आबासाहेब इंग्लिश स्कूल देवणी येथे पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी, तर पोलीस स्टेशन औसा येथे एनएसबी अजीम विद्यालय येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक घायवत यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.















