लातूर : प्रतिनिधी
दिशा प्रतिष्ठान अत्यंत महत्वपूर्ण आणि उत्तम काम करीत आहे. गरजवंतांना क्षमतावानांपर्यंत पोहोचवून त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचे बहूमोल कार्य दिशा प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे आजचे गरजवंत उद्याचे क्षमतावान होतील आणि भविष्यात दिशा प्रतिष्ठनच्या माध्यमातून खूप मोठे काम उभे राहिली, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी व्यक्त केले.
स्व. गुरुशांत नागप्पा लातूरे यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव शिवशंकर लातूरे यांच्या वतीने दिशा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरजू रुग्णांसाठी औषधी सेवा उपक्रमाचे आयोजन दि. २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी येथील एमआयडीसीतील हॉटेल फाईन-डाईन येथे करण्यात आले होते. त्याप्रसंगी पोलीस अधीक्षक अमोल तांबे बोलत होते. या वेळी डॉ. अशोक पोद्दार, डॉ. चेतन सारडा, अभय साळूंके यांची प्रमुख उपस्थिती होती. लातूरच्या भुमित क्षमतावांनाची कमतरता नाही. तशी गरजवंतांचीही संख्या आहे. कारण आज दुष्काळी परिस्थिती आहे, असे नमुद करुन पोलीस अधीक्षक अमोल तांबे पुढे म्हणाले, लातूर प्रतिष्ठानच्या वतीने शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात केले जाणारे काम इतर सामाजिक संस्थांसाठी अनूकरणीय आहे. अतिश्य विश्वासाने या प्रतिष्ठानने गेल्या सहा वर्षांत जे काम केले त्याला तोड नाही.
यंदाचा गणेशोत्सव पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी डॉल्बी व डिजेमुक्त केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करुन यावेळी बोलताना दिशा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक अभिजीत देशमुख म्हणाले, दिशा प्रतिष्ठानने गेल्या ६ वर्षांत ३ लाख रुग्णांना आरोग्य सेवा दिली आहे. प्रत्येक रुग्णााचे १ हजार रुपये गृहित धरले तर दिशा प्रतिष्ठानने ३० कोटी रुपयांची गरीब रुग्णांची बचत केली आहे. यश मिळत नाही ते प्रयत्नच कसले, त्यामुळे प्रयत्न असे हवेत की, त्यात हमखास यश मिळालेच पाहिजे.
यावेळी बोलताना अभय साळूंके म्हणाले, दिशा प्रतिष्ठानचे परमार्थाचे यज्ञ आहे. या यज्ञाने विद्यार्थ्यांना मदत, रुग्णांची सेवा आणि प्रतिष्ठानच्या दात्यांना समाधान मिळत आहे. माणुस जन्माचा उपयोग कसा करावा, याचा विचार सर्वांनी करावा, असे ते म्हणाले. यावेळी शिवशंकर लातूरे यांनी मनोगत व्यक्त करताना वडिलांनी केलेल्या समाजसेवेचा आदर्श समोर ठेवून समाजासाठी काही तरी करण्यासाठी सदैव तत्पर राहाण्याचा आपला संकल्प असल्याचे ते म्हणाले.
यावेळी डॉ. अशोक पोद्दार, वसंत बिराजदार, अनिल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी होतकरु विद्यार्थ्यांना ३ लाख ४५ हजार ८५२ रुपयांच्या निधीचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. कार्यक्रमास दिशा प्रतिष्ठानचे संचालक इसरार सगरे, श्रीमती चित्रा लातूरे, सौ. लातूरे, दत्तात्रय पाटील, सत्यजित देशमुख, डॉ. यशवंत देमुख, डॉ. हंसराज जाधव, महेश मालपाणी, विष्णूदास धायगुडे, वैशाली यादव, इम्रान पठाण, सय्यद रफिक, इंजि. मुख्तार शेख, डिगोळे, मुकेश राजेमाने, यु. व्ही. राव, अॅड. सुनील कांबळे, यूनूस मासूलदार, मुबीन शेख, खदीर पटेल, अभिषेक देशमुख, मुकेश वर्मा यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक दिशा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोनू डगवाले यांनी केले. सूत्रसंचालन बालाजी सूळ यांनी केले.
















