हालचाली वेगात, उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू
मुंबई : प्रतिनिधी
मुंबईसह राज्यातील मुदत संपलेल्या २७ आणि नव्याने स्थापन झालेल्या जालना आणि इचलकरंजी मनपासाठी उद्यापासून (२३ डिसेंबर) रणधुमाळी सुरू होत आहे. कारण मंगळवारपासूनच मनपासाठी उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होत आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यातील सर्व मनपांसाठी १५ जानेवारी रोजी एकत्रित मतदान होणार आहे तर मतमोजणी दुस-याच दिवशी १६ जानेवारी रोजी होणार आहे. दरम्यान, निवडणुकीला २३ दिवस बाकी असताना जागावाटपाची चर्चा सुरू आहे.
गेल्या पाच ते सहा वर्षांपासून सर्वच मनपांमध्ये प्रशासकराज सुरु असल्याने संपूर्ण व्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे आता मनपा नव्या वर्षात नव्या कारभा-यांनी भरून जाणार आहे. राज्यात सर्वच मनपांसाठी उद्यापासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. ऑफलाईन नामनिर्देशन स्वीकारली जाणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी २३ ते ३१ डिसेंबर असणार आहे. दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी दुस-याच दिवशी म्हणजेच ३१ डिसेंबर रोजी केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा दिवस १ जानेवारी २०२६ आहे. चिन्ह आणि अंतिम उमेदवार यादी ३ जानेवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर थेट १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे.
जागावाटपाची डोकेदुखी
मनपा निवडणुकीसाठी महायुतीसह महाविकास आघाडीनेसुद्धा कंबर कसली आहे. मुंबई महानगरसह राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी शिंदेंची शिवसेना आणि भाजप एकत्रित लढतील, असे चित्र आहे. पुण्यात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना रंगण्याची शक्यता आहे. काँग्रेसला सोबत घेण्यासाठी अजित पवारांनी काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते सतेज पाटील यांना फोन केल्याची चर्चा आहे.
महायुतीमध्ये ठाणे
जिल्ह्यात मतैक्य होईना
ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक सहा मनपा असून याठिकाणी भाजप आणि शिंदे सेनेत युतीवरून अजूनही खणाखणी सुरु आहे. नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकीत शिंदेंचा स्ट्राईक रेट तुलनेत सर्वाधिक राहिल्याने त्यांची जागावाटपात ताकद वाढली आहे.

