लातूर : प्रतिनिधी
भारत देशाचं उज्वल भविष्य ज्यांच्या हातात आहे, अशा आपल्या भारत देशातील प्रत्येक बालकाचा बौद्धिक विकास व्हावा, हे उत्कृष्ट उद्दिष्ट समोर ठेवून, केंद्र शासनाच्या सूचनेनुसार ८ वा राष्ट्रीय पोषण पंधरवडा गुरूवार दि. ९ एप्रिलपासून सुरूवात होऊन तो २३ एप्रिल या कालावधीपर्यंत आयोजित करण्यात येणार आहे.
केंद्र शासनाने निश्चित करून दिलेल्या थीमनुसार लातूर जिल्ह्यातील १३ प्रकल्पांतर्गत २ हजार ३२४ अंगणवाड्यांमध्ये केंद्र स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन दि. ९ ते २३ एप्रिल या कालावधीमध्ये करण्यात यावे, व यामध्ये जास्तीत जास्त समुदायाचा सहभाग घेऊन जनजागृती करण्यात येणार आहे. या पोषण पंधरवड्याचा मुख्य उद्देश बालकाच्या जीवनातील पहिल्या ६ वर्षातील मेंदूचा विकास (बौद्धिक विकास) या अनुषंगाने बालकाचा आरोग्य विकास, आणि त्यांच्या मेंदूचा विकास होण्याकरिता पालक व कुटुंब आणि समुदायामध्ये या बाबतचा सराव व्हावा, या करिता जनजागृती करण्यात येणार आहे.

