29.9 C
Latur
Tuesday, February 10, 2026
Homeलातूरआज मतदान; ३५९ उमेदवारांचे ठरणार भवितव्य 

आज मतदान; ३५९ उमेदवारांचे ठरणार भवितव्य 

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिकेच्या १८ प्रभागांतील ७० जागांसाठी आज दि. १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० यावेळेत शहरातील एकूण ३७५ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. निवडणूक रिंगणातील ३५९ उमेदवारांचे भवितव्य आज मतदानयंत्रात बंद होणार आहे. मतमोजणी उद्या दि. १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरु होणार आहे.
लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीत १ लाख ६४ हजार १५२ महिला, १ लाख ५७ हजार १७७ तर इतर २५ असे एकुण ३ लाख २१ हजार ३५४ मतदार मतदान करणार आहेत. या निवडणुकीकरीता ३७५ मतदान केंद्र आहेत. प्रत्यक्ष निवडणुक कामाकरिता १ हजार ६५२ एवढ्या कर्मचा-यांची नेमणुक करण्यात आली आहे. तसेच बीएलओ व सहायक कर्मचा-यांसह २ हजार ५०० कर्मचारी नियुक्त आहेत. नियोजनासाठी २७ कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. व्हीएसटी, एफएसटी, एसएसटी, व्हीव्हीटी इत्यादी पथके कार्यान्वित आहेत.
दिव्यांगांकरिता मतदान केंद्रांवर व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणुकीत मतदान केंद्रनिहाय बीएलओंची नेमणूक केली आहे. त्यांना मतदार स्लीप वाटण्याचे काम देण्यात आले आहे. तसेच मतदान केंद्र शोधण्याकरिता मताधिकार अ‍ॅप व लातूर सिटी डॉट इन ही वेबलिंक व क्यूआर कोड दिला आहे.
त्यात मोबाईल क्रमांक टाकल्यास व्हॉट्सअ‍ॅपद्वारे वोटर स्लीप मिळेल. मतदानासाठी १३३ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. या वाहनांना जीपीएस बसवण्यात आले आहे. झोन अधिका-यांकरिता ४० वाहने देण्यात आली आहेत. ६ आदर्श मतदान केंद्र, ३ सखी मतदान केंद्र तर २ पर्यावरणपुरक मतदान केंद्र आहेत. शहरात ९९ संवेदनशील मतदान केंद्र आहेत. या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त राहील. तसेच या केंद्रांवर प्रशासनाचे लक्षही राहिल. या केंद्रासह ५१ बहुकेंद्र असे एकुण १५० मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे.
मतदान केंद्रांच्या २०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
लातूर शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनिमित्त आज १५ जानेवारी शांतता, निर्भयता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार लातूर शहरातील सर्व मतदान केंद्रांपासून २०० मीटर परिसरात विविध प्रतिबंध लागू करण्यात आले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार महानगरपालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मतदान सुरू झाल्यापासून ते मतदान संपेपर्यंत मतदान केंद्र परिसरात प्रतिबंध लागू राहतील. मतदान केंद्रापासून २०० मीटर परिसरात मंडपे, दुकाने किंवा तात्पुरत्या रचनांचे उभारणे पूर्णपणे प्रतिबंधित राहील. मोबाईल फोन, स्मार्ट फोन, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपक व इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणे बाळगणे किंवा वापरणे यावर बंदी राहील. निवडणूक कामाशी संबंधित नसलेली खाजगी वाहने आणणे, संबंधित पक्षाचे चिन्हे प्रदर्शित करणे, निवडणूक कामाशी संबंधित नसलेल्या व्यक्तींना मतदान केंद्र परिसरात प्रवेश करण्यास मनाई राहील. हे आदेश फक्त मतदान दिवशी सकाळी मतदान सुरू होण्यापासून ते संपूर्ण मतदान प्रक्रिया संपेपर्यंत अंमलात राहतील. आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR