लातूर : प्रतिनिधी
आरटीईतंर्गत पालकांच्या पाल्यांना पहिलीच्या वर्गासाठी २५ टक्के मोफत प्रवेश मिळावा म्हणून जिल्हयातील स्वंय अर्थसहित, विना अनुदानित अशा २०७ शाळांनी नोंदणी केली होती. या शाळेतील २ हजार ३४३ मोफत प्रवेशाच्या जागेसाठी ६ हजार ६९९ पालकांनी पाल्यांचे प्रवेशासाठी ३१ मार्च अखेर पर्यंत नोंदणी केली. सोमवार दि. ६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता मोफत प्रवेशाच्या लॉटरीची सोडत शिक्षण विभागाकडून ऑनलाईन होणार आहे. त्यामुळे प्रवेश अर्ज भरलेल्या पालकांचे या सोडतीकडे लक्ष लागले आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (सी) (१) नुसार दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळा या शाळांमध्ये आरटीई २५ टक्के २०२६-२७ या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पदधतीने राबविण्यात येत आहे. आरटीईतंर्गत पालकांच्या पाल्यांना पहिलीच्या वर्गासाठी २५ टक्के मोफत प्रवेश देण्यासाठी लातूर जिल्हयातील स्वंय अर्थसहित, विना अनुदानीत २०७ शाळांची नोंदणी केली आहे. या शाळेतील २ हजार ३४३ मोफत प्रवेशाच्या जागेसाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज नोंदवण्यासाठी शासनाने तीनदा मुदतवाढ दिली होती. ३१ मार्च पर्यंत पहिलीच्या वर्गात मोफत प्रवेश मिळावा म्हणून ६ हजार ६९९ पालकांनी ऑनलाईन अर्ज नोंदवले.
पालकांना प्रवेशाचे संदेश येणार
ज्या पालकांनी आपल्या पाल्यांचे मोफत प्रवेशासाठी अर्ज नोंदवले आहेत. त्या अर्जांची आज राज्यस्तरीय ऑनलाईन सोडत निघणार आहे. या राज्यस्तरीय ऑनलाईन सोडतीच्या लॉटरीत ज्यांचे नंबर लागले. अशा पालकांना प्रवेशासाठी एसएमएस येणार आहेत. ज्या पालकांना एसएमएस प्राप्त होणार आहेत. त्यांनी त्या-त्या पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन तालुका स्तरीय निवड समितीकडून कागपत्र तपासणी करून घ्यावयाची आहे. कागदपत्र पडताळणीत योग्य असल्यास त्या-त्या शाळेत जाऊन पालकांना प्रवेश घ्यावयाचा आहे.

