लातूर : एजाज शेख
लातूर जिल्ह्यातील दुष्काळामुळे ग्रामीण भागातील आठवडी बाजारांवर अत्यंत गंभीर आणि नकारात्मक परिणाम झाला आहे. दुष्काळाचा आठवडे बाजारातील विविध घटकांना जबर फटका बसत आहे. दुष्काळामुळे शेतक-यांचे आणि शेतमजूरांचे उत्पन्न पूर्णपणे थांबले आहे. पैशांची चणचण असल्यामुळे लोक आठवडे बाजारात फक्त गरजेच्या वस्तू खरेदी करत आहेत. त्यामुळे आठवडी बाजारातील एकुण आर्थिक उलाढाल थंडावली आहे. दुष्काळामुळे लातूर जिल्ह्यातील आठवडे बाजार हे धान्यांचे कडाडलेले भाव, घटलेली आवक, जनावरांचे घसरलेले दर आणि ग्राहकांची शांतता या चक्रात अडकले आहे.
यंदाच्या एप्रिलपासून वाढलेल्या उन्हाच्या चटक्यामुळे जिवाची लाहीलाही होत आहे. दुष्काळाच्या झळा तीव्र होत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचा परिणाम जिल्ह्यातील आठवडी बाजरांवर झाला आहे. दुष्काळामुळे आठवडी बाजारांची उलाढाल निम्म्यावर आली असल्याची स्थिती आहे. परिणामी ग्रामीण भागातील अर्थकारण मंदीत सापडल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे. पाण्याचे स्त्रोत आटल्याने भाजीपाल्याची लागवड कमी झाली आहे. काही ठिकाणी दुष्काळातही महागडे पाणी देऊन पिकवलेला भाजीपाला बाजारात आणला जात आहे. परंतु, ग्राहकांची खरेदी क्षमता कमी असल्याने शेतक-यांना तो अत्यंत कमी भावात विकावा लागत असून उत्पादन खर्चही निघत नाही. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटवरही दुष्काळाचे सावट आहे. कांदा, लिंबु आणि शेवगा सोडला तर बाकी सर्वच भाजीपाला कवडीमोल दराने विकला जात आहे.
















