23.6 C
Latur
Monday, July 14, 2025
Homeमहाराष्ट्रआठवलेंचा भाचा असल्याची बतावणी; वैद्यकीय प्रवेशाच्या नावाखाली १८ लाखांचा गंडा

आठवलेंचा भाचा असल्याची बतावणी; वैद्यकीय प्रवेशाच्या नावाखाली १८ लाखांचा गंडा

नागपूर : केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांचा भाचा असल्याची बतावणी करत मंत्रालयामार्फत एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली एका ठकबाजाने पालकाला १८ लाखांचा गंडा घातला. बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
मोहन व्यंकट खोब्रागडे (५०, भारतनगर, वडधामना) असे तक्रारदाराचे नाव आहे. तर, निखील विश्वनाथ कांबळे (वय ४०, फार्च्युन अपार्टमेंट, मनिषनगर) व त्याची पत्नी शीतल कांबळे, अशी आरोपींची नावे आहेत. मोहन खोब्रागडे सेवानिवृत्त सैनिक असून, ते वायरलेस विभागात २०१२ पासून कार्यरत आहेत. त्यांच्या मुलीला २०२२ मध्ये एमबीबीएस करायचे होते. मात्र, गुण कमी पडल्याने त्यांनी तिला रशियात पाठविण्याचा निर्णय घेतला.

त्या कालावधीत त्यांची भेट आरोपी निखीलसोबत झाली. त्याने मुलीला रशियाला का पाठविता, मंत्रालयाच्या माध्यमातून नागपुरातील लता मंगेशकर वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश करवून देतो, असा दावा केला. त्याबदल्यात ३० लाख रुपये लागतील, असे तो म्हणाला. अखेर २७ लाखांत सौदा ठरला. ऑक्टोबर २०२२ मध्ये खोब्रागडे यांनी निखीलच्या घरी जाऊन १५ लाख रोख व मुलीची कागदपत्रे दिली.

सिक्युरिटी म्हणून निखीलने खोब्रागडे यांना कोरा धनादेशदेखील दिला. काही दिवसांनी खोब्रागडे यांच्या घरी एक फोन आला व प्रवेशाचे काम झाले आहे, तुम्ही निखीलशी संपर्क साधा, असे समोरील व्यक्तीने सांगितले. निखीलच्या सांगण्यावरून खोब्रागडे यांनी ३.१३ लाख त्याच्या खात्यात वळते केले.

मात्र, त्यानंतर प्रवेश झालाच नाही. उशीर झाल्याने २०२३ च्या सत्रात प्रवेश होईल, असे आरोपीने त्यांना सांगितले. मात्र, प्रवेश झालाच नाही व आरोपी दाम्पत्य घर सोडून पसार झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच खोब्रागडे यांनी तक्रार केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR