अतिवृष्टीग्रस्त, पूरग्रस्तांना मिळणार मदत
मुंबई : प्रतिनिधी
राज्यात मागाली काही दिवसांत अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात अनेक जिल्ह्यांतील शेती, घरे, पायाभूत सुविधा आणि रस्त्यांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर बाधितांना मदतीचा ओघ सुरू असून, राज्य सरकारने आज ६४८ कोटी रुपयांचा आणखी निधी मंजूर केला.
राज्य सरकारने या निधीच्या वितरणाला मान्यता दिली. विविध महसूल विभागांनुसार संबंधित जिल्ह्यांना निधी वितरित केला जाणार आहे. हा निधी विशेषत: शेतीतील नुकसान भरपाई, घरांची पुनर्बांधणी, रस्ते आणि पूल दुरुस्ती तसेच प्राथमिक सुविधा पुनर्संचयित करण्यासाठी वापरण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नागपूर विभागात नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नाशिक विभागात नाशिकसह जळगाव, अहिल्यानगर जिल्ह्यांनाही निधीचा लाभ मिळणार आहे. अमरावती विभागातही अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यांना, पुणे विभागात पुण्यासह सोलापूर, सांगली जिल्ह्यांना तर कोकण विभागात ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांना मदत मिळणार आहे. हा निधी तातडीने वितरित करून आपद्ग्रस्तांना तातडीने मदत करावी, असा आदेश प्रशासनाला दिला.
मराठवाड्याला मिळणार वाटा
राज्य सरकारने आज मंजूर केलेल्या निधीपैकी काही वाटा मराठवाड्यातील बीड, लातूर, परभणी, छ. संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड, धाराशिव या जिल्ह्यांना मिळणार आहे. या जिल्ह्यांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. आता त्यांना मदत मिळणार आहे.
















