एअर इंडियाचा सावध पवित्रा, उड्डाणे रद्द केल्याने गैरसोय
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अहमदाबाद येथील विमान अपघातानंतर एअर इंडियाने विमान आणि प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने सावध पवित्रा घेतला असून, तांत्रिक किंवा कोणतीही अडचण निर्माण झाल्यास थेट विमान उड्डाणेच रद्द करण्यात येत आहेत. एअर इंडियाने शुक्रवारीही ८ विमानांची उड्डाणे रद्द केली. यात ४ आंतरराष्ट्रीय तर ४ देशांतर्गत विमान उड्डाणांचा समावेश आहे. विमानतळावरील देखभाल आणि ऑपरेशनल कारणांमुळे ही उड्डाणे रद्द करण्यात आल्याचे एअर इंडियाने म्हटले आहे.
देशांतर्गत उड्डाणांमध्ये पुणे ते दिल्ली उड्डाण एआय ८७४, अहमदाबाद ते दिल्ली उड्डाण एआय ४५६, हैदराबाद ते मुंबई उड्डाण एआय २८७२ आणि चेन्नई ते मुंबई उड्डाण एआय ५७१ रद्द करण्यात आले. तसेच आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये दुबई ते चेन्नई विमान एआय ९०६, दिल्ली ते मेलबर्न विमान एआय ३०८, मेलबर्न ते दिल्ली विमान एआय ३०९ आणि दुबई ते हैदराबाद विमान एआय २२०४ यांचा समावेश आहे.
१९ जून रोजी एअर इंडिया रोजी एअर इंडियाची ४ उड्डाणे रद्द करण्यात आली होती तर १८ जून रोजी ३ विमाने परत बोलावली होती. या तिन्ही विमानांनी आंतरराष्ट्रीय उड्डाणे घेतली होती. त्यामध्ये बालीला जाणारे विमान ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे परत बोलावले होते. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला होता. एकूणच दि. १२ जून ते १७ जूनपर्यंत एअर इंडियाने एकूण ६६ उड्डाणे रद्द केली होती. १२ जूनच्या घटनेनंतर, एअर इंडियाच्या बोईंग ७८७ मालिकेतील ड्रीमलाइनरची चौकशी करण्यात आली, ज्यामध्ये सुरक्षिततेबाबत कोणतीही मोठी समस्या आढळली नाही. परंतु एअर इंडिया कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून काळजी घेत आहे.
विमानाचा मोठा अपघात टळला
एअर इंडियाचे विमान शुक्रवारी हैदराबादहून मुंबईला जाण्यासाठी निघाले होते. तितक्यात विमानात तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे वैमानिकाने विमान धावपट्टीवरच रोखले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. वैमानिकाने अखेरच्या काही मिनिटांमध्ये विमान रोखले. विमानात तांत्रिक बिघाड असल्याने टेकऑफ रद्द केले.
९ दिवसांत ८४ विमान उड्डाणे रद्द
अहमदाबाद विमान अपघातानंतर विविध कारणांमुळे ९ दिवसांत ८४ उड्डाणे रद्द करण्यात आली. अहमदाबाद येथे १२ जून रोजी झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात २७० लोकांचा मृत्यू झाला होता. यानंतर प्रत्येक विमानतळावर विमानांची ऑपरेशनल तपासणी कडक करण्यात आली आहे.