मुंबई : प्रतिनिधी
भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी जाहीर केली होती. इंदिरा गांधी यांच्या या निर्णयाला आज ५० वर्षे पूर्ण झाली. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वर्तमानपत्रामध्ये आणीबाणीच्या मुद्यावर लेख लिहिला आहे. या लेखात त्यांनी आणीबाणीवर टीका करत काही जुन्या कटू आठवणी सांगितल्या आहेत. यावरून आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी निशाणा साधला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वृत्तपत्रामध्ये लेख लिहिला आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, आज ५० वर्षे झाली. त्याला सुवर्णमहोत्सव म्हणायचे तरी कसे? महोत्सव हा चांगल्याचा करायचा असतो. त्यामुळे संविधान, संविधानिक व्यवस्था आणि लोकशाही पायदळी तुडवणा-या काँग्रेस पक्षाने लिहिलेल्या या अध्यायाला ५० वर्षे झाली, एवढेच म्हणावे लागेल.
यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी सोशल मीडिया पोस्ट करून निशाणा साधला आहे. रोहिणी खडसे यांनी लिहिले आहे की, आज २५ जून, पन्नास वर्षांपूर्वी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आजच्या दिवशी देशावर आणीबाणी लादली होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्य नावाची गोष्ट शिल्लक राहिली नव्हती. पण आज तरी काय वेगळी परिस्थिती आहे? आज निवडणूक आयोग स्वतंत्र आहे? माध्यमं स्वतंत्र आहेत? देशातील स्वायत्त संस्थांची स्वायत्तता शाबूत आहे? नाही ना? मग भाजपच्या मंडळींना पन्नास वर्षांपूर्वी लादलेल्या आणीबाणीवर बोलण्याचा काय अधिकार? असे सवाल रोहिणी खडसे यांनी उपस्थित केले आहेत.
पुढे त्यांनी लिहिले की, आज काहींनी वर्तमानपत्रांमध्ये पन्नास वर्षांपूर्वी लादलेल्या आणीबाणीवर रकाणे भरून काढले आहेत. पण ‘‘चिनॉय सेठ, जिनके खुदके घर शीशे के होते हैं वो दूसरों के घरपर पत्थर नहीं फेंकते,’’ अशा शब्दांत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे यांनी जोरदार निशाणा साधला आहे.