मुंबई : प्रतिनिधी
इराण-इस्रायल संघर्षाचे परिणाम आता भारतातही दिसू लागले असून एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर त्याचा थेट परिणाम होत असल्याचे चित्र आहे. खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलिंडरच्या पुरवठ्यावर तात्पुरते निर्बंध आणले असून घरगुती गॅस बुकिंगवर नियमावली लावण्यात आली असून आता पुन्हा चूल पेटवण्याची वेळ येणार का? अशी टीका सतेज पाटील यांनी केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावर केली आहे.
सतेज पाटील यांनी सांगितले की, गॅस टंचाईचा परिणाम फक्त उद्योगांवरच नाही तर सामान्य लोकांवरही होणार आहे. हॉटेलमध्ये जेवणा-या ग्राहकांपासून ते तिथे काम करणा-या हजारो कामगारांपर्यंत अनेक जण या व्यवसायावर अवलंबून आहेत. गॅस पुरवठा कमी झाल्यास व्यावसायिकांचे मोठे नुकसान होईल. तसेच घरगुती पातळीवरही परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. पुढील आठ ते दहा दिवसांत महागाईचा फटका मध्यमवर्गीयांना मोठ्या प्रमाणावर बसू शकतो, असेही त्यांनी म्हटले. सरकार परिस्थिती नियंत्रणात असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत असले तरी प्रत्यक्षात जमिनीवरील स्थिती वेगळी असल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्याने मिठाई व्यवसायावरही परिणाम होऊ लागला आहे. पुण्यातील प्रसिद्ध काका हलवाई मिठाई दुकानाचे मालक युवराज गाढवे यांनी सांगितले की, गॅसचा पुरवठा कमी होत असल्याने उत्पादन खर्च वाढत आहे. काही दुकानदार डिझेल किंवा इलेक्ट्रिक शेगड्यांचा वापर करण्याचा पर्याय शोधत असले तरी तो कायमस्वरूपी उपाय ठरू शकत नाही. त्यामुळे पुढील काळात मिठाईच्या किमती वाढवण्याची वेळ येऊ शकते, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.

