कोल्हापूर : प्रतिनिधी
देशभरातील बहुतांश राज्यांमध्ये भाजप मित्रपक्षांची सत्ता आहे. परंतु देशाला बंगालमध्ये काय होणार याची उत्सुकता होती. बंगालमध्येही आम्ही करून दाखवले. आता बंगालसहित देशवासियांना या कोल्हापूरच्या भूमीतून आश्वस्त करतो की देशातील एक एक घुसखोर शोधून काढल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, घुसखोरांचा व्होट बँक म्हणून वापर करू देणार नाही असा निर्धार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला. तसेच अमित शहा यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला एकनाथ शिंदे यांचे कौतुक करताना ‘याआधी आम्ही शिंदे गट म्हणत होतो. आता गट वगैरे काही राहिले नाही. आता हीच शिवसेना झाली आहे’, असे विधान केले.
येथील पोलिस मैदानावर झालेल्या महायुतीच्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री, खासदार, आमदार उपस्थित होते.
शहा म्हणाले, १२ वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कामाला सुरुवात केली आणि आज विविध क्षेत्रांमध्ये भारत अग्रेसर बनला आहे. सांस्कृतिक पुनरुत्थानाचे काम आम्ही करत आहोत. याच भावनेतून अंबाबाई मंदिराच्या विकासाचे काम महाराष्ट्र सरकारने हाती घेतले याबद्दल मी फडणवीस आणि शिंदे यांना धन्यवाद देतो.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोल्हापूरचे जावई असलेल्या अमित शहा यांचा आम्हाला अंबाबाई मंदिर परिसर विकासासाठी नेहमी आग्रह होता. आज त्यांच्याच हस्ते या कामाचा प्रारंभ झाल्याचा आम्हाला आनंद आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, देशातील नागरिकांच्या मनात विश्वास आणि शत्रूच्या पोटात गोळा निर्माण करण्याचे काम अमित शहा करत आहेत.
















