अहिल्यानगर : प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यातील तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराज यांनी स्वत:वरच वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. या प्रकारात महाराज गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या अहिल्यानगरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराज यांनी स्वत:वर वार केल्याची माहिती समोर आल्याने अनेकांना धक्का बसला. महाराजांच्या अंगावर वार झाल्याचे दिसून आल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. मात्र त्यांनी स्वत:वरच वार का केले, यामागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेमुळे त्यांच्या भक्तांमध्ये प्रचंड संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे.

