इराणची अमेरिकेसमोर अट, भविष्याचीही हमी हवी
तेहरान : वृत्तसंस्था
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगाची झोप उडाली आहे. अशातच आता हे युद्ध संपविण्यासाठी इराणने अमेरिकेसोबत चर्चेसाठी सशर्त सहमती दर्शवली आहे. ही चर्चा पाकिस्तानमार्फत करण्याचा प्रस्ताव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इराण चर्चेसाठी तयार आहे. मात्र, त्यासाठी काही महत्त्वाच्या अटी मांडल्या आहेत. यात सर्वात महत्त्वाची अट म्हणजे त्यांच्यावर सुरू असलेले हल्ले तात्काळ थांबवले जावेत आणि भविष्यात अमेरिका आणि इस्रायल यांनी हल्ला न करण्याची हमी द्यावी. यावर आता डोनाल्ड ट्रम्प काय निर्णय घेतात, हे पाहावे लागेल.
युद्ध थांबवण्याच्या मुद्यावर २९-३० मार्च रोजी पाकिस्तानातील इस्लामाबाद येथे उच्चस्तरीय बैठक होणार आहे. या बैठकीत पाकिस्तान, सौदी अरेबिया, तुर्की आणि इजिप्त सहभागी होणार आहेत. या देशांदरम्यानच्या चर्चेत मध्यस्थीचा रोडमॅप तयार केला जाईल. इराणने यापूर्वी अमेरिकेने सुचवलेला १५ सूत्रीय करार नाकारला होता. आता इराणने ५ अटी अमेरिकेने मान्य केल्यासच पुन्हा चर्चा करण्यास सहमती दर्शविली आहे.
दरम्यान, पाकिस्तानने इराण-अमेरिकेतील युद्ध थांबवण्यासाठी राजनैतिक प्रयत्न अधिक वेगवान केले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियन यांच्याशी फोनवर चर्चा केली. तसेच पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याशी चर्चा केली. आता इस्लामाबादमध्ये तुर्की, इजिप्त आणि सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत बैठक होणार आहे होणार आहे.
इराणच्या अटी
अमेरिका, इस्रायलने तात्काळ सर्व हल्ले थांबवावेत, तसेच भविष्यात हल्ले न करण्याची हमी द्यावी. एवढेच नव्हे त मध्यस्थी करणा-या पाकिस्तान, सौदी अरेबिया, तुर्की आणि इजिप्त यांनीही अमेरिका इराणच्या मुद्यांना गांभीर्याने ऐकेल, याची हमी द्यावी, इराणला होर्मुझ सामुद्रधुनीवर पूर्ण नियंत्रण हवे आहे, असे इराणने म्हटले आहे.
पाकिस्तानात हालचालींना वेग
इराणसोबतचे युद्ध संपवण्यासाठी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे सौदी अरेबिया, तुर्की आणि इजिप्तच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीचे आयोजन पाकिस्तानने केले. इजिप्तचे परराष्ट्र मंत्री बद्र अब्देललाटी यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांची भेट घेतली. इशाक दार हे तुर्कीचे परराष्ट्र मंत्री हाकान फिदान आणि सौदीचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान यांच्यासोबतही स्वतंत्र बैठका घेणार आहेत. ते पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचीही भेट घेणार आहेत.

