छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
सरकार राज्याचे असो वा केंद्राचे जनतेच्या मुद्यांवर सरकारला घाम फोडून आपल्याला आपला दरारा कायम ठेवायचा आहे.आपल्याकडे अनेक पराक्रम करणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नावाचा एक आदर्श कर्णधार आहे. आपण त्यांचे बछडे आहोत, आपल्याला कोणाचे कसले भय? आपल्या मुळावर उठणा-या प्रत्येकाचा हिशेब आपल्यालाच करावा लागणार आहे. अगदी आपल्यातून गेलेल्या कृतघ्न लोकांचाही, असा निर्धार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा १९ जून गुरुवारी ५९वा वर्धापनदिन आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बहाल केले असले तरी, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा या पक्षावरील दावा कायम आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांचे वर्धापनदिन साजरे होत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार अंबादास दानवे यांनी शिवसैनिकांसाठी खुले पत्र लिहिले आहे.