लातूर : प्रतिनिधी
लातूर दुष्काळाने जखम झालेलं शहर. पाण्यासाठी रेल्वे धावली, आणि त्या घटनेने लातूरच्या नावावर एक वेदनादायक कलंक उमटला. कोरडं आभाळ, पाण्याची टंचाई, शेतक-यांची हलाखीची परिस्थिती हळूहळू हे शहर ‘मागास’म्हणून ओळखलं जाऊ लागलं. पण या सगळ्या अंधारात काही तरुणांच्या डोळ्यात एक वेगळंच स्वप्न होतं लातूरला पुन्हा जिवंत करण्याचं, हरित, स्वच्छ आणि सुंदर बनवण्याचं, आणि इथूनच जन्म झाला आमचं ग्रीनलातूर वृक्ष फाउंडेशनचा. आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशन ही फक्त चळवळ नाही, ही वेडाची परिसीमा आहे. गेली तब्बल २५०० दिवस या फाऊंडेशनने अविरत सेवा देत लातूरला हरित करण्यात मोठे योगदान दिले आहे.
या फाऊंडेशनचे हे आहे वेड निसर्गासाठी, मातीसाठी, आपल्या शहरासाठी. या तरुणांनी ओळखलं की दुष्काळाचं मूळ कारण म्हणजे कमी वृक्षसंख्या, आणि मग त्यांनी ठरवलं झाडे लावायची आणि ती जगवायची. या ध्येय्याने प्रेरित होत २४९५ दिवस, एकही दिवस थांबले नाहीत. मागील २४९५ दिवसांत, या आमचं ग्रीन लातूर फाउंडेशनच्या सदस्यांनी उन्हातान्हात, पावसात, वा-यात स्वत:चा वेळ, श्रम आणि आयुष्य या कामासाठी दिलं. रस्त्यांच्या दुतर्फा, दुभाजकांमध्ये सर्वत्र झाडे लावण्यासाठी खड्डे खणले कोरड्या जमिनीत रोपे लावली, पाण्याची सोय केली. प्रत्येक झाडाची मुलासारखी काळजी घेतली. आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशनच्या सदस्यांनी हा संघर्ष जिंकला, आज लातूरच्या रस्त्यांवर हिरवाई दिसते, ती या तरुणांच्या घामाची साक्ष आहे.
लातूर शहरातील मुख्य रस्ते, बा वळण रस्ते, दुभाजक, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, जिल्हा कारागृह, शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, कोर्ट, पोलीस स्टेशन, धार्मिक स्थळे, स्मशानभूमी, कब्रस्तान, इत्यादी या सगळ्या ठिकाणी झाडे उभी आहेत आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशन सदस्यांच्या मेहनतीची जिवंत स्मारके आहेत. स्वच्छतेसाठीही तेवढीच झुंज हरित लातूरसोबतच स्वच्छ लातूर हेही त्यांचं स्वप्न होतं. कच-याने भरलेले रस्ते रिकाम्या प्लॉटमध्ये साचलेली घाण हे पाहून ते फक्त बोलले नाहीत आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशनच्या सदस्यांनी स्वत: हातात झाडू घेतला! वेळोवेळी साफसफाई करत, लोकांमध्ये जागरूकता निर्माण करत लातूरला स्वच्छतेची सवय लावण्याचा प्रयत्न सुरू झाला.
कच-याची समस्या ओळखली आणि उपायही शोधला. छोटे व्यवसायिक दुकानदार, फेरीवाले यांच्याकडे कचरा टाकायला कुंडी नाही! मग त्यांनी काय केलं? रिकामे ड्रम विकत घेतले त्यापासून कचरा कुंड्या तयार केल्या आणि त्या मोफत वाटल्या आज अनेक ठिकाणी कचरा नीट साठवला जातो, हा बदल छोटा नाही, ही मानसिकतेतील क्रांती आहे. पोस्टर फ्री लातूर, प्लास्टिकविरुद्धची लढाई, आदी उपक्रम राबवत आज ही संस्था २५०० दिवसांच्या उंबरठ्यावर उभी आहे, एकही दिवस थांबले नाहीत, एकही दिवस हार मानली नाही. आम्ही झाडें लावतो, जगवतो सुद्धा, फक्त आपण लातूरकर म्हणून झाडें तोडू देऊ नका, असे आवाहन आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशन केले आहे.

