सातारा : शवविच्छेदनाचे चुकीचे अहवाल देण्यासाठी खासदार, त्यांचे दोन पीए आणि पोलिसांकडून महिला सरकारी डॉक्टरवर दबाव आणला होता, असा धक्कादायक आरोप नातेवाइकांनी केला आहे. यामुळे महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. या प्रकरणात पोलिसांनी दबाव न घेता या प्रकरणाचा छडा लावावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
फलटणमधील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्यानंतर नातेवाईक तातडीने बीड जिल्ह्यातील गावाहून साताराकडे रवाना झाले. काही नातेवाईक फलटण शहरात रात्री तीन वाजता पोहोचले. तेव्हापासून सकाळी नऊपर्यंत ते फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया होण्याची वाट पाहत होते. त्यानंतर त्यांना महिलेचा मृतदेह घेऊन सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे रवाना करण्यात आले. दहा वाजता शवविच्छेदनगृहात मृतदेह आणून ठेवला. याठिकाणी त्यांना चार तास ताटकळत राहावे लागले. याबद्दल तीव्र आक्षेप घेत संशयितांना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असे नातेवाइकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
माध्यमांशी बोलताना नातेवाइकांनी सांगितले की, आमची मुलगी हुशार होती. नीट परीक्षेत सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण झाली होती, तसेच वैद्यकीय अधिकारी परीक्षेतही चांगल्या गुणांनी निवड झाली. तिच्याबाबत असे घडेल, असे कधीही वाटले नव्हते, असे सांगत नातेवाइकांनी अश्रूंना मोकळी वाट करून दिली.
पत्रामध्ये खासदार अन् पीएंचा उल्लेख
जून २०२५ मध्ये महिला डॉक्टरने उपविभागीय पोलिस अधिका-यांकडे तक्रार दिली आहे. यामध्ये एक खासदार आणि त्याचे दोन पीए, यांच्यासह अन्य दोन-तीन नावे आहेत. पीए फोन करायचे अन् त्यावरून खासदार बोलायचे, असा आरोप करून या प्रकरणाचा सखोल तपास होऊन न्याय मिळावा, अशी अपेक्षा नातेवाइकांनी व्यक्त केली.

