जाकार्ता : वृत्तसंस्था
इंडोनेशियात लोकप्रतिनिधींच्या वेतनावरून गोंधळ सुरू झाला आहे. संतप्त जमावाने तीन प्रांतांच्या विधानसभा इमारतींना आग लावली. यामध्ये पश्चिम नुसा तेंगारा, पेकालोंगन आणि सिरेबॉनच्या विधानसभा इमारतींचा समावेश आहे. या घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले.
निदर्शकांनी सुराबाया येथील पोलिस मुख्यालयावरही हल्ला केला. सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या नळकांड्या आणि पाण्याच्या तोफांचा मारा केला. निदर्शकांनी फटाके आणि लाठ्या-काठ्यांनी प्रत्युत्तर दिले.
देशात आधीच वाढती बेरोजगारी, कर यातच लोकप्रतिनिधींचा नवीन भत्ता याविरोधात लोक निदर्शने करत होते. दरम्यान, अन्न वितरण करणा-या एका दुचाकीस्वाराला पोलिसांच्या वाहनाने धडक दिल्याने आणि त्यात त्याचा मृत्यू झाल्यानंतर निदर्शने व्यापक आणि हिंसक झाली. यानंतर, अनेक शहरांमध्ये पोलिस आणि निदर्शकांमध्ये संघर्ष सुरू झाला.
आमदारांच्या पगारावरून निषेध : सोमवारपासून जाकार्तामध्ये हे आंदोलन सुरू झाले. सर्व खासदारांना त्यांच्या पगाराव्यतिरिक्त दरमहा ५० दशलक्ष रुपया एचआरए भत्ता मिळतो. हे गेल्या वर्षी सुरू करण्यात आले होते. हे जाकार्तातील किमान वेतनाच्या सुमारे १० पट आहे.
















