लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख दि. २१ सप्टेंबर रोजी उदगीर दौ-यावर होत.े ते तोंडारकडे निघाले होते. त्याच वेळी करडखेल पाटीजवळ ट्रक व दुचाकीचा अपघात झाला होता. आमदार अमित देशमुख यांनी त्या ठिकाणी थांबून या अपघातातील जखमींना रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्याबाबत सहकार्य केले.
लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी चाकूर तालुक्यातील नळेगाव येथून उदगीर तालुक्यातील तोंडारकडे जात असताना करडखेल पाटीजवळ ट्रक व दुचाकीचा अपघात होऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. तेथे अधिच उपस्थित असलेल्यांनी अपघात झाल्यानंतर १०८ क्रमांकावर अॅम्बुलन्ससाठी फोन केला. मात्र अर्धा तास उलटूनही अॅम्बुलन्स आली नाही, असे प्रत्यक्षदर्शनी सांगितले. त्यामुळे आमदार अमित देशमुखयांनी स्वत: जिल्हा शल्यचिकित्सक यांना फोन करून अपघाताची माहिती दिली व अॅम्बुलन्स लवकर पाठवण्यास सांगितले. जिल्हा पोलीस उपअधीक्षकांनाही संपर्क करून अपघात करणा-या वाहनधारकावर कायदेशीर कारवाई करावी तसेच रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या आहेत.
















