सोलापूर: विधानभवनाच्या आवारातील कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करून कसलाही पश्चाताप न झालेले आमदार संजय गायकवाड यांचा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने निषेध करून कॅन्टीन केसरी किताब देऊन उपरोधिक सत्कार करण्यात आला.
हे आंदोलन पक्षाचे शहरप्रमुख महेश धाराशिवकर, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. याप्रसंगी शिवसैनिकांनी संजय गायकवाड यांची विडंबन असलेले पोस्टर फडकवले व विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारात जेव्हा अळ्या, किडे निघतात, त्यावेळी संजय गायकवाड यांना का राग येत नाही किंवा ते संबंधित मंत्र्याला का मारत नाहीत, असा प्रश्न शिवसैनिकांनी विचारला. याप्रसंगी गायकवाड यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. तर उध्दव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांचा जयजयकार करण्यात आला.
याप्रसंगी शहर संघटक सुरेश जगताप, जिल्हा उपप्रमुख दत्ता गणेशकर, महानगर प्रमुख दत्ता माने, संताजी भोळे, विधानसभा मतदारसंघ प्रमुख शशी बिराजदार,विधानसभा संघटक बाळासाहेब गायकवाड, विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख लहू गायकवाड, शहर उपप्रमुख बंटी बेळमकर, उज्ज्वल दीक्षित, चंद्रकांत मानवी,दीपक दळवी, जरगिस मुल्ला, आबा सावंत, दत्ता खलाटे, राहुल परदेशी, मारुती खानापुरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
















