लातूर : प्रतिनिधी
लातूर ग्रामीण मतदारसंघातील विकासकामांसंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी गुरुवार दि. १८ जानेवारी रोजी मंत्रालयात भेट घेतली. आमदार धिरज देशमुख यांच्या सर्व मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिका-यांना तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिल्या. लातूर ग्रामीण मतदारसंघातील पाणी, रस्ते, वर्ग खोल्या, ग्रामीण रुग्णालय याबाबतच्या अनेक मागण्या या बैठकीत उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्याकडे आमदार धिरज देशमुख यांनी केल्या. तसेच, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संबंधित अनेक विषयही या बैठकीत मांडले. या सर्व मागण्यांना अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते.
भरीव निधी आणण्याचे काम सुरुच
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना असंख्य विकासकामे मंजूर करुन लातूर ग्रामीणसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणला. आता विरोधी पक्षात राहून विविध विकासकामे, भरीव निधी आणण्याचे काम सुरू आहे. गावात विविध योजना, विकासकामे नेण्याबरोबरच प्रत्येक गावात आमदार निधीही पोहचवण्याचाही माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यामुळेच लातूर ग्रामीणमध्ये वेगवेगळी विकासकामे झाली आणि अनेक विकासकामे सुरू आहेत, याचा मला अभिमान आहे, अशी भावना आमदार धिरज देशमुख यांनी या वेळी व्यक्त केली.

