जळकोट: ओमकार सोनटक्के
जळकोट तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, आता पाणीटंचाईचे संकटही गडद होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर टंचाई निवारणासाठी विविध उपाययोजनांचे आराखडे तयार करण्याचे काम प्रशासनाच्या स्तरावर सुरू आहे. मात्र, टंचाईच्या परिस्थितीत नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रत्यक्ष कामांना गती मिळणे अपेक्षित असताना, आमदार निधीतून तालुक्यात अद्याप एकही काम सुरू झालेले नसल्याचे चित्र आहे.
तालुक्यात टंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असताना आमदार निधीतून अद्याप एकही काम सुरू झालेले नाही. त्यामुळे टंचाई निवारणासाठी निधीचे नियोजन, कामांची निवड आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यांना कधी गती मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. टंचाई निवारणासाठी केवळ आराखडे तयार करून चालणार नाही, तर त्यानुसार आवश्यक कामे वेळेत सुरू होणेही महत्त्वाचे आहे. विशेषत: ग्रामीण भागातील पाणीपुरवठा आणि उपलब्ध जलस्रोतांचे योग्य व्यवस्थापन याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
















