निलंगा : प्रतिनिधी
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माजी पालकमंत्री तथा निलंगा विधानसभेचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी केला होता पण संभाजी पाटील निलंगेकर यांनी या वर्षीची पावसाची परिस्थिती पाहता शेतक-यांना भेडसावणा-या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपला वाढदिवस साध्या व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करावा असा संदेश दिल्यामुळे यावर्षीचा वाढदिवस साध्या पद्धतीने व सामाजिक उपक्रमाने साजरा केला जाणार आहे.
हलगरा जिल्हा परिषद गटातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा माकणी थोर येथे सकाळी १० वाजता आयोजित केला आहे. सावनगिरा व परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने पदयात्रा काढून पर्जन्यवृष्टीसाठी जागृत देवस्थान माकणी थोर येथील हनुमंतरायास जल अभिषेक करण्यात येणार आहे तसेच निलंगा शहरातील निळकंठेश्वर मंदिरात अभिषेक व महापुरुषांना अभिवादन करण्यात येणार आहे. उपजिल्हा रुग्णालयात फळे वाटप तसेच जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्य वाटप करून तसेच बोरसुरी दि. २१ जून २०२६ रोजी मोफत सर्व रोग निदान व आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भाजपा तालुकाध्यक्ष कुमोद लोभे, शहराध्यक्ष रवी फुलारी व अनिल भंडारे यांनी दिली.
















