ढाका : वृत्तसंस्था
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने बांगलादेशच्या युनूस सरकारला मोठा धक्का दिला. ‘आयएमएफ’ने घोषणा केली आहे की, बांगलादेशात नवीन सरकार स्थापन होईपर्यंत पॅकेजचा सहावा हप्ता दिला जाणार नाही. ही रक्कम सुमारे ८०० मिलियन डॉलर्स इतकी आहे. गेल्या वर्षीच्या सत्तापालटानंतर, बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन झाले आहे. पुढील वर्षी देशात निवडणुका
होणार आहेत. याचदरम्यान, ‘आयएमएफ’ने ही महत्त्वाची घोषणा केली.
जागतिक आर्थिक दबावादरम्यान बांगलादेश सरकारने २०२२ मध्ये ‘आयएमएफ’ची मदत मागितली होती. जानेवारी २०२३ मध्ये, ‘आयएमएफ’ने ४.७ अब्ज डॉलर्सचे कर्ज पॅकेज मंजूर केले. ते नंतर ५.५ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्यात आले. आजपर्यंत बांगलादेशला पाच हप्त्यांमध्ये ३.६ अब्ज डॉलर्स मिळाले आहेत. पण नव्या अटीमुळे युनूस सरकार अडचणीत सापडले आहे.
युनूसच्या अंतरिम सरकारला पॅकेजचा सहावा हप्ता देण्यास ‘आयएमएफ’ने थेट नकार दिला आहे. ‘आयएमएफ’ने म्हटले आहे की, हा हप्ता नवीन सरकारशी वाटाघाटी आणि सध्याच्या आर्थिक सुधारणा कार्यक्रम सुरू ठेवण्याच्या वचनबद्धतेनंतरच दिला जाईल. या सहाव्या ‘आयएमएफ’ हप्त्याचा भाग म्हणून बांगलादेशला अंदाजे ८०० दशलक्ष डॉलर्स (अंदाजे ६,७२० कोटी रुपये) मिळण्याची अपेक्षा होती. पण, आयएमएफ आता युनूस सरकारला पॅकेजचा हा हप्ता देण्यास तयार नाही.

