Homeलातूरआयएमए इमारतीसाठी वर्षभरात जागा देऊ : दिलीपराव देशमुख

आयएमए इमारतीसाठी वर्षभरात जागा देऊ : दिलीपराव देशमुख

लातूर : प्रतिनिधी
शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेल्या लातूरने आता वैद्यकीय क्षेत्रातही आपली ओळख निर्माण केली आहे. लातूर हे मेडीकल हब झाले असून येथील डॉक्टर्स देत असलेल्या दर्जेदार आरोग्य सेवा अन् विश्वासाचे ते फलित आहे. समाज आरोग्यासाठी मोलाचे योगदान देणा-या व महत्वाची भूमिका बजावणा-या आयएमएची इमारत लातुरात नाही या इमारत उभारणीसाठी आपण वर्षभरात  जागा उपलब्ध करुन देवू, असे आश्वासन राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख दिले.
रविवार दि. २६ एप्रिल रोजी आयएमए लातूर जिल्हा शाखा पदाधिका-यांच्या पदगृहण सोहळ्यात माजी मंत्री दिलीपराव देशमुख बोलत होते. हॉटेल कार्निवल येथे झालेल्या या कार्यक्रमास खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. उदय मोहीते-पाटील, सीपीएसचे माजी अध्यक्ष गिरीष मैंदरकर, राज्य आयएमएचे उपाध्यक्ष डॉ. कल्याण बरमदे, प्रतिनिधी डॉ. रमेश भराटे, लातूर आयएमएचे नुतन अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन राऊत, सचिव डॉ. विश्रांत भारती, महिला विंगच्या अध्यक्षा डॉ. श्वेता काटकर, सचिव डॉ. आकांक्षा त्रिपाठी, डॉ. अशोक पोद्दार, डॉ. अजय जाधव, डॉ. विकास साळुंके, डॉ. अभय कदम, डॉ. सुबोध सोमाणी, डॉ. चेतन सारडा, डॉ. अविनाश कुर्डूकर, डॉ. सारिका देशमुख, डॉ. शुभांगी राऊत, डॉ. मेघना गुगळे,  डॉ. मन्सूर भोसगे, डॉ. हमीद चौधरी, डॉ. दीपक गुगळे, डॉ. बाळासाहेब जाधव, डॉ. अजय पुनपाळे, डॉ. किरण डावळे डॉ. वेदांत अवस्थी आदींची प्रमुख उपस्थिती होती.  दीपप्रज्वलन व धन्वंतरी पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी स्व. डॉ. गोपाळराव पाटील यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. डॉक्टरांना शपथ देण्यात आली. यावेळी पद्मभूषण  डॉ. अशोक कुकडे व आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी चित्रफीतीतून  शुभेच्छा दिल्या.
पुढे बोलताना माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले, १०० वर्षांपूर्वी समाजमनावर अंधश्रध्देचा  मोठा पगडा होता. त्यातून समाजाला बाहेर काढून त्यांना आरोग्यसाक्षर करण्याचे काम आयएमएने केले. डॉक्टर व पेशंट यांच्या नात्याचा धागा विश्वासाचा असावा. वैद्यकीय व्यवसायाची प्रतिष्ठा वाढली पाहीजे यासाठी आपणही डॉक्टरांकडे विश्वास व आदराने
पाहीले पाहीजे. आरोग्यसेवा ही शेवटच्या माणसापर्यंत पोहचली पाहीजे. कमीत कमी लोक आजारी पडतील अशी वातावरण निर्मिती केली पाहीजे. आजघडीस मानसिक आजाराचे प्राबल्य वाढत आहे.  माणसे शारीरिक आजाराबद्दल बोलतात डॉक्टरांना दाखवतात मात्र मानसिक आजाराबद्दल सांगण्यात व उपचार घेण्यास ते संकोचतात म्हणून यावर आयएमएने जनजागृती करावी, अशी अपेक्षा दिलीपराव यांनी यावेळी व्यक्त केली.
खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांनी डॉक्टर व रुग्ण यांचे नाते निरोगी ठेवणे गरजेचे असून यासाठी दोघांनीही त्यांच्यातील एकमेकांप्रति विश्वास व समाजशिलता घट्ट करावी असा सल्ला दिला. अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते यांनी लातूर आयएमए कार्यकारीणीत शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांचा मोठा सहभाग असल्याचे सांगितले. अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन राऊत यांनी लातूरमध्ये आयएमएची इमारत व रुग्णालय उभारणीची मागणी केली.  प्रास्ताविकात सचिव डॉ. विश्रांत भारती यांनी  लातूर आयएमएने २३ दिवसांत केलेल्या कार्याचा  लेखाजोखा मांडला. डॉ. मैंदरकर, डॉ. बरमदे, डॉ. श्वेता काटकर, डॉ. आकांक्षा त्रिपाठी यांनीही मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन प्रख्यात निवेदिका क्षीप्रा मानकर यांनी केले. आभार डॉ. मन्सूर भोसगे यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR