लातूर : प्रतिनिधी
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिरुर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ मोड येथे कारवाई करत आयपीएल क्रिकेट सामन्यावर मारुती स्वीफ्ट कारमध्ये बसून ऑनलाईन सट्टा चालविणा-या एका आरोपीस ताब्यात घेत तब्बल ७ लाख ६ हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दि. १५ मे रोजी रात्री पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशांवर, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने येरोळ मोड येथील एका हॉटेलजवळ एक इसम मारुती स्वीफ्ट कारमध्ये बसून आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या सामन्यावर पैसे लावून क्रिकेट सट्टा चालवत आहे. मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचला. रात्री सुमारे १०.५० वाजण्याच्या सुमारास संशयित कार क्रमांक एमएच ५५, बी-०५३४ मध्ये आढळून आला. त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली.
तातेराव शिवाजी दंडीमे, वय ३४ वर्षे, रा. स्वामी विवेकानंद नगर, निडेवन रोड, उदगीर, असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याची व वाहनाची झडती घेतली असता क्रिकेट सट्टा चालविण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य मोबाईल, लॅपटॉप, रोख रक्कम व वाहन असा मुद्देमाल आढळून आला. या कारवाईत आरोपीकडून दोन मोबाईल फोन, एक लॅपटॉप, कार, रोख रक्कम, सट्ट्याच्या हिशोबासाठी वापरण्यात येणा-या डाय-या व कॅल्क्युलेटर असा एकूण ७,०६,७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी मोबाईल व लॅपटॉपच्या माध्यमातून आयपीएल क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन बेटिंग स्वीकारत असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.
सदर प्रकरणी आरोपी तातेराव शिवाजी दंडीमे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस स्टेशन शिरूर अनंतपाळ यांच्यामार्फत करण्यात येत आहे. सदर कामगिरी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार तुळशीराम बरुरे, सूर्यकांत कलमे, पाराजी पुठ्ठेवाड, राजेश कंचे, प्रदीप स्वामी, अंजली गायकवाड, पोलीस ठाणे शिरूर अनंतपाळचे पोलीस अमलदार घाडगे, साठे यांनी केली आहे.
















