मुख्यमंत्र्यांनी स्थापन केली एसआयटी, चौकशी सुरू
मुंबई : प्रतिनिधी
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात एसआयटी गठीत करण्यात आली आहे. आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. आता या प्रकरणात तात्काळ तपास सुरू करण्याचे आदेश या एसआयटीला देण्यात आले.
तेजस्वी सातपुते या २०१२ सालच्या आयपीएस अधिकारी असून त्यांनी सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात पोलिस अधीक्षक म्हणून काम केले आहे. त्यांचा अनुभव लक्षात घेता या प्रकरणाचा तपास त्यांच्याकडे देण्यात आल्याची चर्चा आहे. फलटण प्रकरणात अनेक राजकीय नावांचा समावेश असल्याने त्याची एसआयटी चौकशी करावी अशी मागणी विरोधकांनी सातत्याने लावून धरली. सातारा पोलिसांनी याची चौकशी केली तर त्यांच्यावर दबाव राहू शकतो, त्यामुळे एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी करण्यात येत होती. त्यानंतर आता तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात तपास करण्यात येणार आहे.
फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात काम करणा-या महिला डॉक्टरने २३ ऑक्टोबर रोजी आत्महत्या केली. त्यावेळी तिने हातावर सुसाईड नोट लिहिल्याचे समोर आले. त्यामध्ये पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर आरोप करण्यात आला. या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. यासोबतच इतर संशयित आरोपींची नावेही समोर येत आहेत. त्यामुळे या घटनेचा सखोल तपास करणे आवश्यक आहे.
रणजितसिंह निंबाळकरांवर आरोप
महिला डॉक्टरने तिच्यावर वरिष्ठांचा आणि पोलिसांचा दबाव असल्याची तक्रार केली होती. पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी खासदारांच्या दोन पीएंनी दबाव टाकल्याचा उल्लेख तिने तक्रारीत केला होता. मात्र, तिच्या तक्रारीकडे पोलिसांनी आणि आरोग्य अधिका-यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळेच शेवटी तिने आत्महत्या केल्याची चर्चा आहे.
एसआयटीचे अधिकारी दाखल
राज्य सरकारच्या आदेशानंतर आज एसआयटीच्या प्रमुख अधिकारी आयपीएस तेजस्विनी सातपुते या फलटणमध्ये स्वत: दाखल झाल्या. त्या स्वत: या प्रकरणाचा तपास करत आहेत, असे राज्याचे मंत्री शंभूराज देसाई म्हणाले. या प्रकरणांमध्ये जे जे कोणी दोष असतील, ते प्रत्येक घटना प्रत्येक व्यक्तीची या संदर्भातील तपासणी केली जाईल, असे ते म्हणाले.
















