महिला अत्याचार होताना मोदी कुठे होते?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भाजपला महिलांचे मसीहा बनायचे आहे. पण महिलांनी उन्नाव, हाथरस आणि मणिपूरमध्ये काय घडले ते पाहिले आहे. दिल्लीच्या रस्त्यावर बसलेल्या महिला खेळाडूंना कोणी विचारले, केवळ संसदेत उभे राहून मसीहा म्हणवून घेतल्याने फरक पडत नाही, तर तसे करून दाखवावे लागते, अशा शब्दात काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी पीएम मोदींसह भाजपवर हल्ला चढवला. महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन प्रियंका गांधी यांनी भाजपचे बेगडी प्रेम उघड केले.
आम्हाला आश्चर्य वाटले की, अचानक हे अधिवेशन का बोलावले? कोणालाही मसुदा माहित नव्हता. हे एक प्रकारचे षड्यंत्र होते की महिलांच्या नावावर आरक्षण आणून स्वत:ची सत्ता कायमस्वरूपी कशी टिकवता येईल. हे विधेयक महिलांसाठी नव्हते तर ते पुनर्रचनेसाठी होते, अशी टीका त्यांनी केली. भाजप म्हणतेय की हा काळा दिवस आहे. त्यांच्यासाठी तो काळा दिवस असेलच. कारण पहिल्यांदाच त्यांना असा मोठा धक्का बसला आहे. आता पीआर आणि मीडियाबाजी चालणार नाही, असेही प्रियंका गांधी म्हणाल्या.
घटनादुरुस्ती विधेयकाच्या नावाखाली सरकारने संपूर्ण कट रचला. कारण यांना कायम सत्तेत राहायचे होते. ते आता होणार नाही; मतदारसंघ पुनर्रचना २०२९ पर्यंत होणार नाही. हे महिलांच्या नावावर केले जात होते, जेणेकरून त्यांना सत्तेत राहण्याचे स्वातंत्र्य मिळेल. केंद्र सरकारला वाटले की, जर हे विधेयक मंजूर झाले, तर ते जिंकतील. जर तसे झाले नसते, तर ते प्रत्येक विरोधी पक्षनेत्याला महिला-विरोधी सिद्ध करून महिलांचे तारणहार बनले असते. हा महिलांचा प्रश्न नव्हता तर मतदारसंघ पुनर्रचनेचा होता. विरोधी पक्षाने निषेध केला याचा मला आनंद आहे, असेही प्रियंका गांधी म्हणाल्या.
जनतेचा विश्वास उडाला
आता जनतेचा विश्वास उडाला आहे. इंदिरा गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी यांनी जागांच्या संख्येवर फ्रीज लावला होता. कारण त्यांना उत्तर आणि दक्षिण भारतामध्ये फूट पाडायची नव्हती. जर सरकारने पुनर्रचनेद्वारे दक्षिण भारतातील आणि छोट्या राज्यांचे वजन कमी केले तर देशात मोठे संकट निर्माण होईल. आम्ही याच्याशी सहमत होऊ शकत नाही, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.
लोकशाहीचा विजय
काल लोकसभेत जे घडले, तो लोकशाहीचा मोठा विजय आहे. महिला आरक्षण विधेयकाच्या आडून लोकशाही कमकुवत करण्याचा सरकारचा कट उधळला गेला. हा संविधान, देश आणि विरोधी पक्षांच्या एकतेचा विजय होता. त्यांचा मूळ हेतू अत्यंत धक्कादायक होता, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.
















