शरद पवारांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर
मुंबई : प्रतिनिधी
मराठा आरक्षण आणि ओबीसींचे आरक्षण या मुद्यावरून आज शरद पवार यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली. सरकारमधील लोकांनी मराठा आंदोलक जरांगे पाटील आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याशी स्वतंत्र चर्चा केली. परंतु ही चर्चा सार्वजनिक झाली नाही. त्यासाठी सर्वांना एकत्रित बोलावून सरकारने मार्ग काढावा, त्यासाठी आम्ही सहकार्य करायला तयारा आहोत, असे म्हटले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी या मुद्यावरून राजकारण न करता सर्वांनी एकत्र यावे, त्यासाठी सरकार तयार आहे, असे म्हटले. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी आम्हाला आरक्षणाचे पडले आहे. यांना खुर्ची वाचवायचे पडले असल्याचा आरोप केला.
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार शनिवारी छत्रपती संभाजीनगर दौ-यावर होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आरक्षणाच्या मुद्यावरून राज्य सरकारला धारेवर धरले. सरकारने आरक्षणाच्या मुद्यावरून दोन्ही समाजांच्या प्रतिनिधींशी वेगवेगळी चर्चा केली हे चूक होती. दोन्ही समाजाशी एकत्र संवाद साधायला हवा होता. तसे झाले असते तर एवढा तणाव निर्माण झाला नसता. आताही सरकारने सर्वांना एकत्रित बोलवावे, असे म्हटले. पवार यांच्या या टीकेवरून राज्यात वादळ उठलेले असतानाच खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
ते म्हणाले की, आमची जशी भूमिका आहे. तशी सर्वांनी भूमिका घेतली पाहिजे. ओबीसींवर अन्याय करायचा नाही, ही भूमिका आमची काल होती, आजही आहे. सर्वांना खुले आवाहन आहे की, या, बसा, चर्चा करा. तुमच्या मागण्या सांगा. आपण अनेक प्रश्नावर काम केले आहे. जरांगे, ओबीसी नेते असतील किंवा राजकीय नेते असतील, सर्वांनी यावे. या प्रश्नात मार्ग काढला पाहिजे. त्यासाठी चर्चेची तयारी असल्याचे म्हटले.कुणबी नोंदी सापडल्या, त्यानुसार प्रमाणपत्र दिले. मराठा समाजाला १० टक्के वेगळे आरक्षण दिले. त्याचबरोबर मुलींचे शिक्षण मोफत केले. सारथी आणि अण्णासाहेब पाटील महाविकास मंडळातून मराठा समाजाला योजना दिल्या. या मुद्यावरून आणखी चर्चा करून शांततेने मार्ग काढणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
आमचा जीव आरक्षणात,
नेत्यांचा जीव खुर्चीत
मराठा समाजाचा जीव आरक्षणात आहे, हे सरकारच्या लक्षात आले आहे. त्यामुळे सरकारने मराठ्यांना आरक्षण द्यायचे नाही, असे ठरवले आहे. मग आता मराठा समाजानेही तुमचा जीव सत्तेत असेल तर मग यांना सत्ताच द्यायची नाही, असे ठरवले आहे. सरकारने आरक्षण दिले नाही तर मला माझ्या समाजाला सत्तेत बसवल्याशिवाय आणि यांना पडल्याशिवाय पर्याय नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.