मुंबई : राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालये व जिल्हा रुग्णालयांनी महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट असलेले उपचार मिशन मोडवर सुरू करावेत, अशा सूचना आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या.
मुंबईतील ‘सुरुची’ शासकीय निवासस्थानात महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे अधिकारी व आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिका-यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी आरोग्य मंत्री म्हणाले, सरकारी दवाखान्याच्या माध्यमातून जनआरोग्य योजना राबवल्या गेल्या पाहिजेत. त्यामुळे शासनाचे पैसे सरकारी रुग्णालयाला मिळतील. या निधीच्या माध्यमातून सरकारी रुग्णालयाचे सक्षमीकरण होण्याबरोबरच डॉक्टरांनाही अधिक चांगला प्रोत्साहन भत्ता मिळेल. यापूर्वी जनआरोग्य योजनेशी संलग्नित झालेल्या रुग्णालयांचा गेल्या सहा महिन्यांतील प्रगतीचा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. न्यूरो, कॅन्सर आणि ऑर्थो (अस्थिरोग) यासारख्या गंभीर आजारांच्या उपचारांसाठी वाढीव पॅकेज देण्याबाबत सामंजस्य करार करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या आहेत.
महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या जिल्हा समन्वयकांनी अधिक सक्रिय होऊन काम करावे. स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार तसेच जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी सतत संपर्कात राहून योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी. महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या वरिष्ठ अधिका-यांनी क्षेत्रीय भेटी देऊन योग्य सनियंत्रण करावे. रुग्णालयांना मिळणा-या कॉर्पस् फंडाचा विनियोग रुग्णालयातील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी, औषध खरेदीसाठी आणि डॉक्टरांच्या प्रशिक्षणासाठी खर्च करावा. त्यासाठी एक समिती स्थापन करून, एसओपी तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शासकीय रुग्णालयांनी स्वत:च्या पायावर उभे राहून दर्जेदार आरोग्य सेवा देणे अपेक्षित असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
महात्मा फुले जन आरोग्य योजनेची व्यापक प्रसिद्धी करावी, योजनेची माहिती देणारे टोल फ्री नंबर सर्वत्र प्रदर्शित करावेत, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.
बैठकीस महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अण्णासाहेब चव्हाण, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, संचालक पुणे डॉ. विजय कंदेवाड यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

