नातेवाईकांनी गाडी फोडली, आरोपी बेड्यांसह फरार
किनवट : प्रतिनिधी
आरोपी शेख वखार याला बेड्या ठोकून तेलंगणा पोलिसांचे पथक वाहनाने परत आदिलाबादकडे निघाले होते. मात्र, किनवट-आदिलाबाद मार्गावरील चिखली गावाजवळ आरोपीच्या नातेवाईकांनी आणि समर्थकांनी पोलिसांची गाडी अडवली आणि थेट पोलिसांवर हल्ला करीत गाडी फोडली. या झटापटीत आरोपी बेड्यासह फरार झाला. किनवट तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडला. आरोपी अद्याप फरार असून, त्याचा शोध घेतला जात आहे.
या धक्कादायक घटनेमुळे खळबळ उडाली असून, या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित आरोपीचा शोध सुरू केला आहे. किनवट तालुक्यात चोरीच्या प्रकरणातील एका सराईत आरोपीला अटक करून घेऊन जाणा-या तेलंगणा पोलिसांच्या पथकावर आरोपीच्या नातेवाईकांनी भीषण हल्ला केला.
किनवट-आदिलाबाद मार्गावर पोलिसांची गाडी अडवून तुफान दगडफेक करण्यात आली आणि गाडीची तोडफोड करण्यात आली. यावेळी अचानक झालेल्या हल्ल्याचा आणि गोंधळाचा फायदा घेत आरोपी हातातील बेड्यांसह (हातकडी) शेजारील जंगलात पसार झाला. या हल्ल्यात पोलिस गाडीचे नुकसान झाले असून, पोलिसही जखमी झाले आहेत. आता पोलिसांनी हल्लेखोरांसह फरार आरोपीचा शोध सुरू केला.
















