मुंबई : प्रतिनिधी
‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूचा चित्रपट ‘आशा’ चा टिझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. ‘बाई अडलीये म्हणूनच ती नडलीये’ या प्रभावी टॅगलाईनसह हा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. येत्या १९ डिसेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘आशा’ चित्रपटाच्या कथानकाच्या केंद्रस्थानी आशा सेविका आहे आणि ही भूमिका अभिनेत्री रिंकू राजगुरू साकारत आहे. या व्यक्तिरिक्त या चित्रपटात अभिनेता सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, दिलीप घारे आणि हर्षा गुप्ते यांसारखे कलाकार देखील महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकणार आहेत. रिंकूने साकारलेली ‘आशा’ ही फक्त आरोग्य यंत्रणेतील एक कर्मचारी नसून प्रत्येक महिला, प्रत्येक कुटुंबासाठी मार्गदर्शक, आधार आणि निर्भय आवाज आहे. तिच्या डोळ्यांतून दिसणारा संघर्ष, तिच्या पावलांतून जाणवणारी जबाबदारी आणि संकटांचा सामना करताना न हरता उभी राहणारी ताकद आहे. या सर्वांमुळे ही भूमिका चित्रपटाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
तसेच प्रदर्शनाआधीच या चित्रपटाने आपली ताकद सिद्ध केली आहे. ६१व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात तब्बल चार पुरस्कार मिळवत ‘आशा’ने समीक्षकांची दाद मिळवली आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. याबाबत दिग्दर्शक दिपक पाटील म्हणतात, ‘आशा’ हा चित्रपट फक्त आशा आरोग्य सेविकांचा नाही तर घर सांभाळून, घरासाठी घराबाहेर पडणा-या प्रत्येक बाईचा आहे. तिच्या स्वप्नांचा, तिच्या जिद्दीचा आहे. सतत नवनवीन विषयांना उचलून धरणा-या मराठी प्रेक्षकांना ही वेगळ्या वाटेवरची वेगळी आणि अनोखी गोष्ट निश्चितच आवडेल, अशी खात्री आहे’. दिपक पाटील दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, निलेश कुवर, दैवता पाटील आणि दिपक पाटील यांनी केली आहे.

