मुंबई : प्रतिनिधी
मराठमोळा अभिनेते रितेश विलासराव देशमुख सध्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या सिनेमात त्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची बाजूही रितेश देशमुख यांनी सांभाळली. सिनेमाची बॉक्स ऑफिसवर उत्तम घोडदौड सुरू आहे. रेकॉर्डब्रेक कमाई करत ‘राजा शिवाजी’ सिनेमा नवा विक्रम रचण्यास सज्ज झाला आहे.
सिनेमाच्या प्रमोशनसाठी खास रितेश देशमुख ‘इंडियन आयडॉल’च्या सेटवर गेले. यावेळी त्यांनी आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच भावनिक किस्सा शेअर केला. आशा भोसले यांना ‘राजा शिवाजी’ हा सिनेमा पाहायचा होता, असा भावनिक खुलासा रितेश देशमुख यांनी प्रोमोशनमध्ये केला.
रितेश देशमुख यांनी आशा भोसले यांच्याशी संबंधित एक भावनिक आठवण शेअर केली. ‘जेव्हा मी त्यांना भेटलो, तेव्हा त्यांनी माझ्या डोक्यावरून अशा प्रकारे हात फिरवला, जशी एखादी आई आपल्या बाळाला कुरवाळते. मी त्यांना आशा आई म्हणायचो. आजही त्याच नावाने हाक मारतो. आम्ही एके दिवशी सहज गप्पा मारत होतो. त्यांनी मला माझ्या आवडत्या पदार्थाबद्दल विचारले. त्यांनी माझ्यासाठी माझ्या आवडीचे जेवण केले. मला जेवणासाठी घरी बोलावलं. मी गेलो आणि आम्ही जेवण केले. खूप सा-या गप्पा गोष्टी केल्या’, असे रितेश देशमुख म्हणाले.
आशा भोसले यांनी ‘राजा शिवाजी’ चित्रपटाला पाठिंबा दिला होता, असेही रितेश देशमुख म्हणाले. तो क्षण आठवून रितेश देशमुख म्हणाले, ‘माझा तुला आशीर्वाद आहे. चांगला चित्रपट बनव. प्रदर्शित झाल्यानंतर मला हा चित्रपट बघायचा आहे’, असे रितेश देशमुख म्हणाले. दोन आठवड्यांपूर्वी मला त्यांच्या कुटुंबाकडून फोन आला होता. अशाजींची इच्छा होती, त्यांना हा सिनेमा पाहायचा होता’. शेवटी रितेश देशमुख भावूक झाले होते. ‘दुर्दैवाने आशा आई हा चित्रपट पाहू शकल्या नाहीत. मला आशा आईंची खूप आठवण येते’, असे म्हणत रितेश देशमुख यांनी हा भावनिक किस्सा शेअर केला.

