गडचिरोली : प्रतिनिधी
गडचिरोली जिल्ह्यातून एक अत्यंत दुर्दैवी बातमी समोर आली आहे. धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील एका निवासी आश्रमशाळेत झोपेत असताना सर्पदंश झाल्याने तीन चिमुकल्या विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जपतलाई येथील या निवासी आश्रमशाळेत नेहमीप्रमाणे रात्री सर्व विद्यार्थिनी जेवण करून आपल्या खोलीत झोपल्या होत्या. रात्रीच्या गाढ झोपेत असताना विषारी सापाने खोलीत घुसून तीन विद्यार्थिनींना दंश केला. रात्री उशिरा ही बाब आश्रमशाळेतील कर्मचा-यांच्या आणि इतर मुलींच्या लक्षात आली. कर्मचा-यांनी तातडीने या विद्यार्थिनींना उपचारासाठी धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
मृत विद्यार्थिनींमध्ये दीपिका लकडा (इयत्ता ६ वी), सुष्मिता मंडल (इयत्ता ८ वी) आणि अनु कोरेटी (इयत्ता २ री) यांचा समावेश आहे. आदिवासी दिनाचा कार्यक्रम संपल्यानंतर सर्व विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे खोलीत झोपल्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास विषारी सापाने खोलीत प्रवेश करून त्यांना दंश केला. त्रास होऊ लागल्याने मुलींनी आरडाओरड केली, त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने आणि विष शरीरात भिनल्याने तिन्ही मुलींचा मृत्यू झाला. वसतिगृहात पुरेशा खाटा उपलब्ध नसल्याने विद्यार्थिनींना जमिनीवर गाद्या टाकून झोपावे लागत होते. तसेच, पावसाळ्यात विषारी प्राण्यांचा वावर वाढत असतानाही आश्रमशाळा परिसरात आवश्यक ती स्वच्छता, कीटकनाशकांची फवारणी किंवा इतर सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या.
पालकांचा आक्रोश
या घटनेची माहिती मिळताच विद्यार्थिनींच्या नातेवाईकांनी गडचिरोली जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. आपल्या पोटच्या गोळ्यांचा असा अचानक आणि तडफडून मृत्यू झाल्याचे पाहून पालकांनी आणि नातेवाईकांनी रुग्णालयाच्या परिसरात एकच आक्रोश केला. आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या घटनेची माहिती मला मिळाली असून यासंदर्भातील अधिकची आणि सविस्तर माहिती मी प्रशासनाकडून मागवली आहे.















