लातूर : प्रतिनिधी
६ जुलै रोजी आषाढी एकादशी असून यानिमित्ताने लाखो भाविक-भक्त हे विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. या दरम्यान, भाविकांना पंढरपूरला जाणे आणि येणे सोपस्कर व्हावे यासाठी प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही रेल्वेने आषाढी विशेष फे-यांची घोषणा करण्यात आली आहे.
यामध्ये लातूर आणि परिसरातील भाविकांसाठी २ जुलै ते ९ जुलै या कालावधीत लातूर-पंढरपूर अनारक्षित विशेष गाड्या चालविण्यात येणार असल्यामुळे परिसरातील भाविकांना विठूरायाचे दर्शन घेणे सुलभ होणार आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी जाणा-या भाविकांची संख्या मोठी आहे. यंदा ६ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. तरी भाविकांची पंढरपुर वारी सुलभ व्हावी यासाठी लातूर-पंढरपूर अनारक्षित विशेष गाड्यांच्या १० फे-या जाहीर केल्या आहेत. या गाड्यांना ८ स्लीपर क्लास, ६ जनरल सेकंड क्लास, २ सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन अशी कोचेसची रचना आहे. यामध्ये ट्रेन क्रमांक ०५१०९ अनारक्षित विशेष गाड्या २ जुलै, ४ जुलै, ७ जुलै, ८ जुलै आणि ९ जुलै या पाच फे-या लातूर हून सकाळी ७.३० वाजता निघतील आणि त्याच दिवशी दुपारी १२.५० वाजता पंढरपूरला पोहोचतील. ट्रेन क्रमांक ०११०२ अनारक्षित विशेष गाडी २ जुलै, ४ जुलै, ७ जुलै, ८ जुलै आणि ९ जुलै रोजी दुपारी १.५० वाजता पंढरपूर हून निघेल आणि त्याच दिवशी सायंकाळी ७.२० वाजता लातूरला पोहोचेल. लातूर ते पंढरपुर मार्गावरील हरंगुळ, औसा रोड, मुरुड, ढोकी, कळंब रोड, येडशी, धाराशिव, पांगरी, बार्शी टाउन, शेंद्री, कुडूवाडी आणि मोडनिंब या स्थानकांवरून भाविकांना पंढरपूरला जाणे आणि परत येणे सोईचे होणार आहे.