मंत्री महाजन यांची शिष्टाई यशस्वी, २२ जूनआधी बैठक घेणार
पंढरपूर : प्रतिनिधी
शेतक-यांची सरसकट कर्जमाफी करावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे गेल्या ३ दिवसांपासून पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू होते. आज मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत रोहित पवारांनी तूर्त उपोषण मागे घेतले. महाजनांच्या शिष्टाईला आज यश आले. २२ जूनच्या आधी मुंबईत बैठक होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी बोलावल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली.
आपल्या मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक आहे. शेतक-यांना न्याय देण्याचा विचार केला जात आहे. जर आमच्या मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा ४ जुलैला शेतक-यांच्या वतीने मराठवाड्यात मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला. यावेळी रोहित पवार यांनी कर्जमाफी योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिल्याबद्दल महाजन यांचे अभिनंदन केले. सरकारने काढलेला जीआर महत्वाचा आहे. मात्र, या जीआरमध्ये अनेक अटी आहेत. यामुळे अनेक शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, असेही ते म्हणाले. २०१९ ची कर्जमाफी झाली. त्यामध्ये ज्या शेतक-यांनी लाभ घेतला, त्यांना या योजनेत लाभ झाला पाहिजे. सरसकट कर्जमाफी करा, अशी आमची मागणी आहे. रविकांत तुपकर बुलढाण्यात आंदोलन करत आहेत. त्यांनाही भेटा, असे रोहित पवार म्हणाले.
यावेळी महाजन यांनी जवळपास ३७ हजार कोटी रुपयांपर्यंत कर्जमाफी केली जाणार आहे. चर्चा केल्यावर सकारात्मक निर्णय होऊ शकतो. यासाठी चर्चा करावी लागेल, असे म्हटले. कर्जमाफीमध्ये सुधारणा झाली पाहिजे, असे वाटत असेल तर आपण चर्चा करू. २२ तारखेच्या आत बैठक घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे महाजन म्हणाले. २०१९ मध्ये जी कर्जमाफी झाली, त्या योजनेत शेतक-यांनी लाभ घेतला, त्या शेतक-यांना आताही लाभ मिळू शकतो, असे महाजन म्हणाले.
शेतकरी नेत्यांसह
चर्चेला जाणार
कर्जमाफी योजनेतील जाचक अटी काढाव्यात, असे सांगतानाच आ. रोहित पवार यांनी चर्चेसाठी जाताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी, रविकांत तुपकर, किसान सभेचे डॉ. अजित नवले, शेकापचे जयंत पाटील, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ हे सर्वजण येतील, असेही पवार म्हणाले.
१ रुपयात पिक विमा
योजना सुरू करावी
येणारे वर्ष कठीण आहे, यंदा पाऊस कमी पडणार आहे. पिके जळून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्जमाफी योजना अटीशिवाय लागू करणे गरजेचे आहे, असे रोहित पवार म्हणाले. तसेच १ रुपयात जी पिक विमा योजना होती, ती पुन्हा सुरू करावी, अशी मागणी आ. रोहित पवार यांनी केली.
















