नवी दिल्ली : एसआयआरबाबत सुरू असलेल्या विरोधादरम्यान १९ विरोधी पक्षांचे नेते मंगळवार दि. ६ ऑक्टोबर रोजी दिल्लीत निवडणूक आयोगाला घेराव घालणार आहेत. इंडिया आघाडीचे विरोधी खासदार दिल्लीत लोकशाही वाचवा मार्च काढणार आहेत. ते संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत सुमारे ३ किमी पायी चालत जाणार आहेत.
विरोधी आघाडीने ३० सप्टेंबर रोजी दिल्लीतील कॉन्स्टिटयूूशन क्लबमध्ये झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेतला होता. सुमारे ३ तास चाललेल्या बैठकीत ३ मुद्यांवर सहमती झाली होती. पहिला मुद्या मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवण्यासाठी संसदेत प्रस्ताव आणावा. दुसरा मतदार यादीतून वगळण्यात आलेली नावे सार्वजनिक करावीत. नावे वगळण्यापूर्वी मतदाराला नोटीस आणि अपील करण्याची संधी मिळावी आणि तिसरा ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यात याव्यात. यापूर्वी ११ ऑगस्ट २०२५ रोजी कठऊकअ आघाडीच्या खासदारांनी संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढला होता. यात राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार यांच्यासह २५ विरोधी पक्ष सहभागी झाले होते.
१९ पक्षांकडे लोकसभेत १७८ खासदार
इंडिया ब्लॉकचे १९ पक्ष मोर्चा काढणार आहेत. त्यांच्याकडे लोकसभेत १७८ आणि राज्यसभेत ६२ खासदार आहेत. हे पक्ष आहेत काँग्रेस, समाजवादी पार्टी, टीएमसी, एनसीपी (एसपी), शिवसेना (यूबीटी), आरजेडी, सीपीएम, सीपीआय, एनसी, पीडीपी, जेएमएम, सीपीआय-एमएल, आययूएमएल, केसी (एम),एमडीएमके, व्हीसीके, आरएसपी, एआयएफबी आणि केसी (जे).
















