नवी दिल्ली : वृत्तसंस्था
इंडोनेशियाच्या सागरी किना-याजवळ शनिवारी भल्या पहाटे ७.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा अत्यंत शक्तिशाली भूकंप झाला. संपूर्ण समुद्रा किनारा हादरल्यानंतर स्थानिक प्रशासनाकडून तत्काळ त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. भूकंपाच्या मुख्य धक्का बसल्यानंतरही परिसरात अनेक तीव्र आफ्टरशॉक्स जाणवले असून, सध्या संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
यूरोपियन-मेडिटेरेनियन सिस्मोलॉजिकल सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू समुद्राच्या तळाशी सुमारे ३५ किलोमीटर खोलीवर होता. स्थानिक वेळेनुसार पहाटे सुमारे ४:५८ वाजता हा भूकंप नोंदवला गेला. मुख्य भूकंपानंतर लगेचच किमान तीन मोठे आफ्टरशॉक्स नोंदवले गेले आहेत. यामुळे भूगर्भातील हालचाली अजूनही शांत झालेल्या नसून, आगामी काळात आणखी धक्के बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या सागरी भूकंपानंतर इंडोनेशियाच्या हवामान आणि भूभौतिकी एजन्सीने देशातील काही किनारी भागांसाठी तातडीने त्सुनामीचा इशारा जारी केला आहे. एजन्सीच्या पथकांकडून परिस्थितीवर २४ तास बारीक लक्ष ठेवलं जात असून, भूकंप आणि त्यानंतरच्या धक्क्यांमुळे कोणत्या भागांना जास्त फटका बसू शकतो, याचा अंदाज घेतला जात आहे.
दुस-या बाजूला, ऑस्ट्रेलियाच्या त्सुनामीचे इशारे देणा-या यंत्रणेनं दिलासादायक माहिती दिली आहे. या भूकंपामुळे ऑस्ट्रेलियाची मुख्य भूमी, तेथील बेटे किंवा इतर क्षेत्रांना त्सुनामीचा कोणताही धोका नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
भूकंपाचा केंद्रबिंदू समुद्राच्या आत असल्याने इंडोनेशियातील जमिनीवरील भागांवर याचा नक्की किती प्रभाव पडला आहे, हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. तसेच या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही.
















