14.7 C
Latur
Friday, November 14, 2025
Homeमहाराष्ट्रइंद्रनील नाईक यांची गोंदियाच्या पालकमंत्रिपदी वर्णी

इंद्रनील नाईक यांची गोंदियाच्या पालकमंत्रिपदी वर्णी

इंद्रनील नाईक यांची गोंदियाच्या पालकमंत्रिपदी वर्णी

मुंबई : प्रतिनिधी
‘लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आहे’ असे वादग्रस्त वक्तव्य सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले होते. त्यांच्या या असंवेदनशील वक्तव्यावर टीकेची झोड उठल्यानंतर सारवासारव करत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. दरम्यान राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी गोंदियाच्या पालकमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी स्वत: याची पुष्टी केली आहे. त्यांच्या जागी आता राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडे गोंदियाच्या पालकमंत्रिपदाची धूरा सोपवण्यात आल्याची माहिती आहे. पाटील यांनी तडकाफडकी राजीनामा देण्याचें कारण काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बाबासाहेब पाटील यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी सांगितले की प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला आहे. यावेळी त्यांना विचारण्यात आले की तुमच्या पक्षाचे नेते प्रफुल पटेल यांनी केलेल्या टीकेमुळे तुम्ही हे पाऊल उचलले आहे का? ते गोंदिया येथे म्हणाले होते की ‘जिल्ह्याचे पालकमंत्री पिकनिकल्या आल्याप्रमाणे गोंदियाला येतात, केवळ १५ ऑगस्ट व २६ जानेवारी रोजी झेंडावंदन करण्यासाठी जिल्ह्याला भेट देतात.’ यावर स्पष्टीकरण देताना पाटील म्हणाले, ‘तसं काहीच कारण नाही.’

बाबासाहेब पाटील म्हणाले, प्रफुल पटेल यांनी सांगितले ते बरोबर आहे. आपण १५ ऑगस्ट, २६ जानेवारी व १ मे रोजी जातो, त्यानंतर दोन-तीन महिन्यातून एकदा जातो. परंतु, पटेल यांनी टीका केली म्हणून रागारागाने मी राजीनामा दिलेला नाही. मुळात राग यायचे कारण नाही. पालकमंत्रिपदावरून थोडी गैरसोय होते. परंतु, सगळेच काही मनासारखे होणार नाही. कारण राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे.
‘मला लातूर जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळावे असे वाटत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील तीच इच्छा होती. परंतु, ते पालकमंत्रिपद शिवेंद्रराजे भोसले यांना दिले गेले युतीत थोड्या तडजोडी कराव्या लागतात.

पाकलमंत्रिपदांमध्ये फेरबदल केले तरी मी काही मागणी करणार नाही. मी यापूर्वी देखील कधी तशी मागणी केली नव्हती.’

राजीनाम्याचे कारण काय
प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचं बाबासाहेब पाटील यांनी सांगितलं आहे. पाटील यांच्या गुडघ्यावर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतरही त्रास होत असल्याचं त्यांनी सांगितलं. पाय दुखत असल्यामुळे लांबचा प्रवास करता येत नाही असंही त्यांनी सांगितलं.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR