लातूर : प्रतिनिधी :
सध्या सर्वत्र सुरू असलेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर, खरीप हंगामाच्या पूर्वतयारीची व बागायती शेतीच्या मशागतीची कामे इंधनाअभावी थांबू नयेत, यासाठी शेतक-यांना सुलभतेने पेट्रोल व डिझेलचा पुरवठा करण्यात यावा; तसेच गरज पडल्यास शेतक-यांसाठी इंधन पुरवठ्याची स्वतंत्र व्यवस्था निर्माण करावी, अशी आग्रही मागणी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, माजी पालकमंत्री तथा महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केली आहे.
या संदर्भात त्यांनी सोमवारी, दि. २५ मे रोजी जिल्हाधिकारी भारत बास्टेवाड यांना पत्र पाठवून तातडीने पावले उचलण्याची विनंती केली आहे. शेतकरी बांधवाकडून खरीप हंगामाच्या तयारीची तसेच ऊस व बागायती शेतीच्या मशागतीची सध्या कामे सुरु आहेत. शेती मशागतीच्या या कामासाठी ट्रॅक्टर तसेच इतर वाहनांचा व तांत्रीक अवजारांचा वापर करण्यात येतो आहे. यासाठी पेट्रोल / डिझेलची या इंधनाची नितांत आवश्यकता भासते आहे. या अनुषंगाने माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी जिल्हाधिकारी भारत बास्टेवाड यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात नमूद केले आहे की, माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी इंधन टंचाईची सर्वत्र चर्चा सुरु असताना अनेक पेट्रोल पंपावर गाड्यांच्या रांगा लागल्याचे दिसून येत आहे.
याठिकाणी शेती मशागतीच्या यंत्रासाठी लागणारे पेट्रोल/डिझेल घेऊन जाण्यासाठी शेतकरी कॅन / बॅरल घेऊन येत आहेत. या शेतक-यांना काही पेट्रोल पंपावर इंधन नाकारले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. इंधन पुरवठ्यात अडचणी येत असल्यामुळे अनेक ठिकाणी पेट्रोल/डिझेलची टंचाई भासत आहे ही वस्तुस्थिती आहे. हे जरी खरे असले तरी सद्यस्थितीत शेतीची कामेही होणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतक-यांनाही शेती कामासाठी इंधन उपलब्ध होणे आवश्यक आहे. शेतक-यांची समस्या, अडचण आणि त्यांची गरज लक्षात घेऊन, त्यांना सुलभ पद्धतीने आवश्यकतेनुसार पेट्रोल/डिझेल उपलब्ध करुन देण्यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व पेट्रोल-डिझेल पंप धारकांना आपल्या स्तरावरुन सूचना देण्यात याव्यात. शेती कामासाठी इंधन उपलब्ध करुन देण्यासंदर्भात वेगळी व्यवस्था निर्माण करता येते का हेही पहावे. एकाही शेतक-याची शेती कामे इंधनाअभावी रखडली जाऊ नयेत याची दक्षता घ्यावी, अशी विनंती या पत्राद्वारे आमदार अमित देशमुख यांनी जिल्हाधिका-यांकडे
केली आहे.
















