Homeलातूरइंधन दरवाढीच्या अफवेने पेट्रोल पंपांवर गर्दी 

इंधन दरवाढीच्या अफवेने पेट्रोल पंपांवर गर्दी 

लातूर : प्रतिनिधी
इंधन दरवाढ होणार, इंधनाचा साठा संपणार, अशी अफवा सोशल मीडियावरुन रविवारी वा-यासारखी पसरली आणि लातूर शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी पेट्रोल, डिझेल पंपावर वाहनधारकांनी एकच गर्दी  केली. शहरातील काही पेट्रोल पंप सायंकाळीच बंद झाले. मात्र रविवारी मध्यरात्रीपर्यंत वाहनधारक पेट्रोल पंपावरच होते.  सोमवारीही अगदी सकाळपासून पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची मोठी गर्दी होती. दरम्यान इंधन दरवाढ होणार, इंधन साठा संपणार, अशा अफवा पसरवण्यात पेट्रोल पंप चालकही सहभागी असल्याचे वाहनाधरकांमधून बोलले जात होते.
रविवारी सकाळी शहरातील सर्वच पेट्रोल पंप सुरळीतपणे सुरु होते. दुपारनंतर परिस्थिती बदलली. एक तर रविवार सुटीचा दिवस, लग्न सराईमुळे लग्नांची संख्या सर्वाधिक होती. व-हाडी मंडळीही मोठ्या प्रमाणात लातुरात होती. दुसरे म्हणजे नीटची परीक्षा होती. त्यामुळे हजारो विद्यार्थी आणि पालक बाहेरुन लातूरला आले होते दुपारी २ ते सायंकाळी ५ यावेळेत नीटची परीक्षा संपली. बाहेरुन आलेले विद्यार्थी, पालकांनी जाताना त्यांनी डिझेल, पेट्रोल आपापल्या वाहनात भरले. रविवार असल्याने डिझेल, पेट्रोलचा पुरवठा झाला नाही परंतु, खप वाढला त्यामुळे इंधनसाठा संपला. परिणामी सायंकाळीच काही पेट्रोल पंप बंद करण्यात आले. पेट्रोल पंप बंद झाल्याने वाहनधारकांना अफवा खरी वाटली आणि पेट्रोल पंपांवरील गर्दी वाढली.
तालुका स्तरावर विशेष पथके स्थापन
अंमलबजावणीसाठी तालुकास्तरावर विशेष पथके गठीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये पथक प्रमुख म्हणून संबंधित पुरवठा निरीक्षण अधिकारी, सहायक पथक प्रमुख म्हणून संबंधित पुरवठा निरीक्षक किंवा सहायक महसूल अधिकारी आणि सदस्य म्हणून संबंधित पुरवठा विभागाचे लिपिक-टंकलेखक यांचा समावेश करण्यात आला आहे. ही पथके आपापल्या कार्यक्षेत्रातील पेट्रोल पंपांची अचानक तपासणी करतील. तपासणी दरम्यान जर एखादा पेट्रोल पंप चालक दोषी आढळला, तर त्यांच्यावर केवळ आर्थिक दंडच नाही तर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये पेट्रोलियम नियम २००२, जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५, भारतीय नागरिक सुरक्षा २०२३ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदींनुसार कडक कारवाई केली जाईल. या आदेशाची प्रत सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आली आहे. जिल्ह्यातील तेल कंपन्यांच्या सेल्स ऑफिसर्सनाही या मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून देण्यात आली.
कृत्रिम टंचाई निर्माण करणा-यांवर होणार कारवाई!
जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही, काही पेट्रोल पंप चालकांकडून विनाकारण पंप बंद ठेवले जात असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. ग्राहकांना इंधन नाकारून  कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा हा प्रकार सार्वजनिक हिताला बाधा आणणारा असून, याची गंभीर दखल घेत प्रभारी जिल्हाधिकारी राहुल कुमार मिना यांनी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालकांसाठी नियमावली जाहीर केली आहे. त्यांनी जिल्ह्यातील पेट्रोलपंप धारकांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेवून याबाबत सूचना दिल्या आहेत.
यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी व्यंकटेश रावलोड यांच्यासह पेट्रोलपंप चालक व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पेट्रोलपंप चालकांनी साठा उपलब्ध असताना कोणत्याही परिस्थितीत विक्री बंद ठेवू नये. तसेच ग्राहकांना इंधन देण्यास कोणत्याही परिस्थितीत नकार देऊ नये. इंधनाची मर्यादित विक्री करणे किंवा कारणाशिवाय अडथळे निर्माण करणे टाळावे. शासनाने ठरवून दिलेल्या विहित वेळेत पंप नियमित सुरू ठेवावेत. पंपावर दर्शनी भागात इंधनाचे दर स्पष्टपणे दिसतील असे फलक लावावेत. स्टॉक आणि विक्रीची नोंद रोजच्या रोज अपडेट असावी आणि तपासणी अधिका-यांना सर्व नोंदवह्या उपलब्ध करून द्याव्यात.  साठा लपविणे किंवा मुद्दाम टंचाई निर्माण करणे हे नियमांचे उल्लंघन मानले जाईल. पंपावर
सीसीटीव्ही प्रणाली २४ तास कार्यरत असावी आणि त्याचे रेकॉर्ड प्रशासनास उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना सर्व पेट्रोलपंप चालकांना यावेळी देण्यात  आल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR